सन 2025 मध्ये उत्तर प्रदेशातील प्रयागराज या धार्मिक शहरात महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाणार आहे. धार्मिक समजुतीनुसार मकर संक्रांतीपासूनच कुंभस्नानाला सुरुवात होणार असून देश-विदेशातून लाखो भाविक गंगास्नानासाठी धार्मिक नगरीत येणार आहेत. हिंदू धर्मात महाकुंभमेळ्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे, यावेळी 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या कालावधीत उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होणार आहे.
महाकुंभमेळा 12 वर्षांतून एकदा आयोजित केला जातो. या वेळी गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमावर कोट्यवधी भाविक स्नानासाठी येतात. त्यात एकदा स्नान केल्याने भक्तांची सर्व पापे नष्ट होऊन मोक्ष प्राप्त होतो, असे सांगितले जाते.
प्रयागराज येथे 2020 साली आयोजित केलेला कुंभ हा अर्धकुंभ होता, अर्धकुंभ दर 6 वर्षांनी येतो आणि महाकुंभ 12 वर्षांनी येतो. चला तर मग जाणून घेऊया दर 12 वर्षांनी कुंभ का आयोजित केला जातो आणि त्यामागील मान्यता काय आहे.
कुंभमेळ्याची सुरवात
कुंभमेळ्याच्या आयोजनाचा इतिहास 850 वर्षांहून अधिक जुना असल्याचे सांगितले जाते. आदि शंकराचार्यांनी हा मेळा सुरू केल्याचं सांगितलं जात. काही कथांमध्ये असे सांगितले जाते की समुद्र मंथनाच्या प्राचीन काळापासून कुंभाचे आयोजन केले जात होते. काही विद्वानांचा असा विश्वास आहे की याची सुरुवात गुप्त काळापासून झाली परंतु सम्राट हर्षवर्धन यांच्याकडून त्याचे पुरावे आढळतात. यानंतर आदि शंकराचार्य आणि त्यांच्या शिष्यांनी संन्यासी आखाड्यांसाठी संगमाच्या काठावर शाही स्नानाची व्यवस्था केली.
या चार ठिकाणीच का होतो कुंभमेळा?
कथांनुसार देव आणि दानवांनी मिळून समुद्रमंथन केले होते. या मंथनादरम्यान अनेक रत्ने, अप्सरा, प्राणी, विष आणि अमृत इत्यादी बाहेर पडले. अमृतावरून देव आणि दानवांमध्ये संघर्ष सुरू झाला. या लढाईत अमृताचे काही थेंब पृथ्वीवर पडले. जिथे जिथे अमृताचे थेंब पडले तिथे तिथे कुंभाचे आयोजन करण्यात आले. प्रयाग, हरिद्वार, नाशिक आणि उज्जैन येथे अमृताचे थेंब पडल्याचं बोलले जाते.
या देवतांचा विशेष आधार
अमृतासाठीच्या संघर्षात चंद्राने अमृत वाहून जाण्यापासून वाचवले होते आणि त्यानंतर गुरु बृहस्पती देव यांनी कलश लपवला होता. सूर्यदेवाने कलश तुटण्यापासून वाचवले आणि शनिदेवाने इंद्राच्या कोपापासून त्याचे रक्षण केले. त्यामुळे जेव्हा जेव्हा हे ग्रह एका राशीत जुळतात तेव्हा महाकुंभ आयोजित केला जातो. कारण या ग्रहांच्या संयोगाने अमृत कलशाचे रक्षण झाले, त्यानंतर देवतांनी भगवान विष्णूच्या मदतीने अमृत प्याले.
कुंभमेळा दर बारा वर्षयांनीच का?
शास्त्रानुसार पृथ्वीचे एक वर्ष हे देवतांच्या एका दिवसासारखे असते. यानुसार पृथ्वीच्या गणनेनुसार 12 वर्षे देव आणि दानवांचे युद्ध चालू होते. या युद्धाचा कालावधी 12 वर्षांचा होता, त्यामुळे 12 वर्षांनी कुंभ आयोजित केला जातो. देवांची 12 वर्षे पृथ्वीच्या 144 वर्षांच्या बरोबरीची आहेत. 144 वर्षांनंतर स्वर्गात कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते, असे मानले जाते. म्हणून त्या वर्षी पृथ्वीवर महाकुंभ आयोजित केला जातो.