जळगाव : छगन भुजबळ यांच्याकडे महायुती सरकारने अन्न आणि पुरवठा विभागाची जबाबदारी सोपवली आहे. आता नाशिकचे पालकमंत्रीपद देखील भुजबळ यांना मिळावे, अशी इच्छा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. दरम्यान, यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मंत्री गिरीश महाजन?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मंत्रिपद मिळाल्याची भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली होती. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, नाशिकचे पालकमंत्री कुणाला करायचे ? हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हातात आहेत. छगन भुजबळ यांनी दावा करणे काही वाईट नाही. पालकमंत्री मीच असावा, असं त्याना वाटत असेल तर आमच्याकडून त्यांचे स्वागतच आहे, असेही महाजन यांनी नमूद केले.
खडसेंची ‘ती’ जमीन वडिलोपार्जीत नव्हे!
जळगाव जिल्ह्यातून जाणाऱ्या इंदूर-हैदराबाद महामार्गाच्या ठिकाणीची जमीन ही वडिलोपार्जीत नसून ती खडसे यांनी गेल्या वर्षी खरेदी केल्याचा आरोप मंत्री महाजन यांनी केला आहे. तसेच खडसे यांनी ती जमीन कधी खरेदी केली, त्याचा पुरावे आपल्याकडे आहेत, असा दावाही महाजन यांनी केला.
तसेच मुक्ताईनगरच्या शेतकऱ्यांचे आंदोलन पोलिसांनी हाणून पाडल्याचा आरोप होत असल्याबद्दल मंत्री महाजन यांनी आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. ते पोलीस कसे हाणून पाडतील? असा प्रश्न करत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी शेतकऱ्यांची चर्चा सुरु झाल्याचे ही मंत्री महाजन यांनी सांगितले.
