महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं मतदान आज पार पडलं आहे. राज्यातील ४ हजार १४० उमेदवारांचं भवितव्य आता मतपेटीत कैद झालं आहे. 23 नोव्हेंबरला निकाल लागणार असून, यापूर्वी एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. या आकडेवारीतून राज्यात कुणाची सत्ता येऊ शकते, याबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यात गेल्या पाच वर्षात प्रचंड घडामोडी बघायला मिळाल्या. गेल्या निवडणुकीनंतर सलग दोन ते अडीच वर्ष कोरोना संकटाने हैराण केलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. यानंतर राजकारणाचा अक्षरश: चिखल उडालेला बघायला मिळाला. कोण कुणाच्या बाजूने आहे, हेच स्पष्ट होईना. त्यामुळे जनता आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते देखील अनेकदा संभ्रमात पडले. पण आता हेच चित्र बदलवण्याची संधी मतदारांना मिळाली आहे.
या निवडणुकीत मतदारांनी कुणाला सर्वाधिक पसंती दिली आहे ते येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहेच, पण त्याआधी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेक्षणातून पोलचे अंदाज समोर आले आहेत.
मॅट्रीझच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १५० ते १७० जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला राज्यात ११० ते १३० जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.
चाणक्यच्या पोलनुसार, राज्यात महायुतीला १५२ ते १६० जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १३० ते १३८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मात्र, या निवडणुकीत मतदारांनी कुणाला सर्वाधिक पसंती दिली आहे ते येत्या 23 तारखेला स्पष्ट होणार आहे.