मुंबई : महाराष्ट्र्र विधानसभा विधिमंडळ अधिवेशनाचा आज दुसरा दिवस सुरू आहे. आज काँग्रेसचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन प्रश्न उपस्थित करत टंचाईमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी केली. त्यांवर उत्तर उत्तर देतांना मंत्री अनिल पाटील यांनी एनडीव्हीआयचे निकष लागू केले असल्याचे सांगितले. यावर आमदार जयंत पाटील यांनी एनडीव्हीआय म्हणजे काय ? याची माहिती देण्याची मागणी केली. त्यावर अनिल पाटील गांगरल्याने मंत्री धनंजय मुंडे उभे राहिले व त्यांनी एनडीव्हीआयचा लाँगफॉर्म सांगितला.
आमदार थोरात यांनी सभागृहात शेतकऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, मागील वर्ष हे टंचाईचे होते, या परिस्थीतही शेतकऱ्यांनी पीक आणली. बारमाही पीक होती त्याच जानेवारी महिन्यात नुकसान झाले. नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे नुकसान झाले, आता जुलै महिना जवळ आला आहे. सहा महिने होऊनही शेतकऱ्यांसाठी काहीही निर्णय घेतलेला नाही. आज नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे होते, पुन्हा खरिपासाठी त्या शेतकऱ्यांना काम करावं लागतं. आता अजुनही सर्व्हे येणार असल्याचं सांगत आहेत, अशी पद्धत कधीच नव्हती. यावर सहा महिने निर्णय नाही, या मुद्द्यावर आता तातडीने निर्णय घेणार का? हा माझा प्रश्न आहे, असा सवाल आमदार थोरात यांनी यावेळी केला.
या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मंत्री अनिल पाटील देत होते. अनिल पाटील म्हणाले, आम्ही याबाबत १५ जुलैपर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी तारीख दिली आहे. यासाठी आमचं काम सुरू आहे. याच्यातून कोणताही शेतकरी वगळला जाऊ नये म्हणून केंद्र सरकारने २०१६ मध्ये एनडीव्हीआयचे निकष लागू केले आहेत. ते निकष लागू झाल्यानंतर आठ दिवसात ती मदत केली जाईल, असं उत्तर मंत्री अनिल पाटील यांनी दिले. यावेळी सभागृहात जयंत पाटील यांनी एनडीव्हीआय म्हणजे काय याची माहिती देण्याची मागणी केली.
आमदार जयंत पाटील यांच्या प्रश्नानंतर मंत्री धनंजय मुंडे उत्तर देण्यासाठी उभे राहिले. यानंतर जयंत पाटील यांनी ज्यांना प्रश्न विचारला आहे त्या मंत्र्यांनीच उत्तर दिले पाहिजे असं सांगितलं. यानंतर धनंजय मुंडे बोलताना म्हणाले, एनडीव्हीआयचा अहवाल वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठाला दिला आहे. २०१६ पासून एनडीव्हीआयच्या निकषावर शेतकऱ्यांना मदत दिली जाते. यावेळी मुंडे यांनी इंग्रजीमध्ये एनडीव्हीआयचा फुलफॉर्म सांगितला.