मुंबई : उपमुख्यमंत्री तथा अर्थ व नियोजनमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या आहेत. या घोषणा नेमक्या कोणत्या आणि कोणाला काय फायदा होणार हे जाणून घेऊया…
मुंबईसाठी काय घोषणा
- मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र, म्हणजेच ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला-वरळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व विरार – बोईसर या सात ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे निर्माण केली जाणार आहेत.
- गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथून मांडवा, एलिफंटापर्यंत सुरक्षित प्रवासाकरिता अत्याधुनिक सुविधायुक्त बोटींसाठी आर्थिक प्रोत्साहन देण्याचे धोरण जाहीर करण्यात येणार आहे.
गडचिरोलीसाठी काय घोषणा
- गडचिरोली जिल्हा आता “स्टील हब” म्हणून उदयास येत आहे.
- दावोस येथे झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेमध्ये गडचिरोलीसाठी २१ हजार ८३० कोटी रुपयांच्या गुंतवणूकीचे सामंजस्य करार करण्यात आले आहे.
- गडचिरोलीच्या दळणवळणासाठी खनिकर्म महामार्गांचे जाळे विकसित केले जात असून त्याकरिता पहिल्या टप्प्यात सुमारे ५०० कोटी रुपये किंमतीची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
वीजनिर्मित्ती, वीजेचा लाभ
- महावितरण कंपनीने येत्या ५ वर्षांसाठी वीजेचे दर निश्चित करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे सादर केला आहे.
- ऊर्जा क्षेत्रातील नियोजन व कमी दराच्या हरित ऊर्जेच्या खरेदीमुळे येत्या पाच वर्षात वीज खरेदी खर्चामध्ये १ लाख १३ हजार कोटी रुपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.
आशियाई विकास बँक प्रकल्प, रस्ते बांधणी
- आशियाई विकास बँक प्रकल्प टप्पा-१ पूर्ण झाला आहे.
- टप्पा- २ मधील ३ हजार ९३९ कोटी रुपये किंमतीची ४६८ किलोमीटर रस्ते सुधारणांची कामे हाती घेण्यात आली असून त्यापैकी ३५० किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहे.
- टप्पा-3 अंतर्गत ७५५ किलोमीटर रस्ते लांबीची ६ हजार ५८९ कोटी रुपये किंमतीची २३ कामे हाती घेण्यात आली आहेत.
- सुधारित हायब्रीड ॲन्युईटी योजनेअंतर्गत ६ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत, या कामांची किंमत 36 हजार 964 कोटी रुपये आहे.
- प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा -3 अंतर्गत ६ हजार ५०० किलोमीटर लांबीची, ५ हजार ६७० कोटी रुपये किंमतीची कामे मंजूर असून त्यापैकी 3 हजार ७८५ किलोमीटर लांबीची कामे पूर्ण झाली आहेत. सन २०२५-२६ साठी १५०० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते कामे
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-१ ची कामे पूर्णत्वास आली असून टप्पा-२ अंतर्गत ९ हजार ६१० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या दर्जोन्नतीची कामे मार्च, २०२६ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-२ अंतर्गत अतिरिक्त ७ हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा-3 अंतर्गत १ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली 3 हजार ५८२ गावे, १४ हजार किलोमीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याने प्रमुख जिल्हा मार्गांना, राज्य महामार्ग किंवा राष्ट्रीय महामार्गांना जोडली जातील.
- या प्रकल्पाची एकूण किंमत 30 हजार १०० कोटी रूपये आहे. पहिल्या टप्प्यात 8 हजार कोटी रूपये रकमेची कामे हाती घेण्यात येणार आहेत.
समृद्धी महामार्ग ते शक्तीपीठ महामार्ग
- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे ९९ टक्के काम पूर्ण झाले असून त्यासाठी ६४ हजार ७५५ कोटी रुपये खर्च झाला आहे.
- इगतपुरी ते आमणे हा ७६ किलोमीटर लांबीचा टप्पा लवकरच वाहतुकीसाठी खुला होईल. या महामार्गालगत अॅग्रो-लॉजिस्टिक हब विकसित केले जाणार असून त्यात कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग व निर्यात हाताळणी केंद्राच्या प्रमुख सुविधा पुरविण्यात येतील.
- याचा लाभ प्रामुख्याने विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना होईल. वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रादेवी या 760 किलोमीटर लांबीच्या, ८६ हजार ३०० कोटी रुपये किंमतीच्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाची कार्यवाही प्रगतीपथावर आहे.
मुंबई आणि उपनगर भुयारी मार्ग, रस्ते
- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम ऑगस्ट, २०२५ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
- यामुळे प्रवासाचा वेळ आणि इंधन या दोन्हीत बचत होईल आणि वाहतूक कोंडीतूनही सुटका होईल.
- मुंबई उपनगर परिसरातील वाहतूक गतिमान व्हावी यासाठी वर्सोवा ते मढ खाडीपूल, वर्सोवा ते भाईंदर किनारी मार्ग, मुलुंड ते गोरेगाव, ठाणे ते बोरिवली आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्ग असे ६४ हजार ७८३ कोटी रुपये किंमतीचे प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.
- स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतूचे वांद्रे ते वर्सोवा या दरम्यानचे १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे, २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
- उत्तन ते विरार या सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्चाचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
मुंबई, पुणे, नागपूर मेट्रो
- मुंबई, नागपूर व पुणे महानगरांतील नागरिकांना पर्यावरणपूरक, शाश्वत, विनाअडथळा व वातानुकुलित वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एकूण १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत.
- या सेवेचा लाभ सुमारे १० लाख प्रवासी रोज घेत आहेत
- येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, तर पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो
लाडकी बहिण योजना
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत सुमारे २ कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, २०२४ पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे.
- त्यासाठी 33 हजार २३२ कोटी रुपये खर्च झाला आहे.
- सन २०२५-२६ मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.
- या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचं अजित पवारांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी काय?
- कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा शेतीक्षेत्रात वापर
- पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांच्या एक लाख एकर क्षेत्राला फायदा
- दोन वर्षात ५०० कोटी रुपयांचा निधी
- महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमाअंतर्गत कालवे वितरण प्रणालीतील सुधारणेची सुमारे 5 हजार 36 कोटी रुपये किमतीची कामे मंजूर
- मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअतंर्गत साडेसात हॉर्सपॉवरपर्यंतच्या ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज पुरवण्यात येत आहे. २०२४ पर्यंत ७ हजार ९७८ कोटींची वीज सवलत देण्यात आलीय.
- नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी 351 कोटींची तरतूद करण्यात आलीय. शेतीत एआयच्या वापराचं धोरण आणण्यात येतंय. शेतकऱ्यांना सल्ला देणं, दर्जेदार उत्पादन आणि शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रणाली पुरवण्यासाठी एआयचा वापर केला जाणार आहे. यासाठी ५०० कोटींचा निधी दिला जाणार आहे.
- मुस्लिम समाज व आदिवासी समाजासाठीदेखील अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.