मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज, मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात महाराष्ट्र पोलीस दलात १५ हजार पदभरती, रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ, सोलापूर-पुणे-मुंबई हवाई मार्गासाठी प्रति आसन व्यावहारिक तूट निधी देण्याचा निर्णय, तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ आदी निर्णय घेण्यात आले.
महाराष्ट्रात १५,००० पोलीस भरतीस मंजुरी देण्यात आली असून, पुढील दोन महिन्यात भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तसेच रास्त भाव दुकानदारांचा मार्जिन वाढ, हवाई प्रवासासाठी निधी, आणि सामाजिक न्याय विभागाच्या कर्ज योजनेत सवलत, तीन महामंडळाच्या कर्ज योजनेतील जामिनदारांच्या अटी शिथिल, शासन हमीस पाच वर्षे मुदतवाढ आदी निर्णय घेण्यात आले आहे.
रिक्त पदांचा आढावा घेऊन होणार भरती
राज्याच्या पोलीस दलात सन २०२४ दरम्यान रिक्त असलेली व २०२५ मध्ये रिक्त होणाऱ्या पदांचा आढावा घेऊन, ही भरती करण्यात येणार आहेत. भरण्यात येणारी पदांची संख्या अशी, पोलीस शिपाई – १० हजार ९०८, पोलीस शिपाई चालक – २३४, बॅण्डस् मॅन – २५, सशस्त्री पोलीस शिपाई – २ हजार ३९३, कारागृह शिपाई – ५५४. पोलीस शिपाई व कारागृह शिपाई ही पदे गट – क संवर्गातील आहेत. पोलीस शिपाई भरती प्रक्रिया त्या-त्या जिल्हा स्तरावरून राबविण्यात येते. त्यासाठी ओएमआर आधारित लेखी परीक्षा घेण्यात येईल.