महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादाचे उत्तर महाराष्ट्रात पडसाद

नाशिक : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादात बेळगावमधील हिरे बागेवाडी टोल नाक्याजवळ कन्नड संघटनांकडून महाराष्ट्रातील ट्रकसह इतर वाहनांवर दगडफेक केल्यानंतर महाराष्ट्रातही संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद बुधवारी नाशिकमध्येही उमटताना दिसून आले. नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेत कर्नाटक सरकारच्या भूमिकेचा तीव्र शब्दात निषेध करीत घोषणाबाजी केली. तसेच कॅनडा कॉर्नर भागातील कर्नाटक बँकेच्या नाम फलकाला काळे फासून कर्नाटक सरकारविरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या.

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा वादात आक्रमक भुमिका घेत सोलापूर, सांगली या महाराष्ट्रातील जिल्ह्यात कर्नाटक सरकार पाय पसरण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या योजत असल्याने हा मुद्दा आणखी संवेदनशील बनला आहे. त्यातच महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक केल्याने हा वाद आणखीनच चिघळला. महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांसह संघटनांनी याविरोधात आक्रमक भुमिका घेतली आहे.

दरम्यान नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने आक्रमक भूमिका घेत संघटनेचे प्रदेश प्रवक्ते करण गायकर यांच्या नेतृत्वाखाली विविध पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कर्नाटक सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर यांच्यासह संघटनेचे निमंत्रक आशिष हिरे, प्रमोद जाधव सुभाष गायकर, भारत पिंगळे, सागर जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. महाराष्ट्राच्या अस्मितेवर जर कोणी घाला घालीत असेल तर यानंतर त्याला जशास तसे उत्तर देऊन प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा स्वराज्य संघटनेतर्फे देण्यात आला आहे.