महाराष्ट्र – कर्नाटक सीमावाद आणि अमित शहांची सासूरवाडी ; काय आहे कनेक्शन?

मुंबई : महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावर आज दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आणि शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच सीमा वादाचा लढा हा जरी न्यायालयात सुरू असला तरी देखील या प्रकरणात केंद्र सरकारने लक्ष घालावं, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी संजय राऊत यांनी सीमा प्रश्नावरून अमित शहा यांना टोला लगावला आहे. अमित शाह हे महाराष्ट्राचे जावई आहेत. त्यांची सासरवाडी असलेल्या कोल्हापूरला सीमावादाचे सर्वाधिक चटके बसत आहेत, त्यामुळे अमित शाह यांनी या प्रकरणात भूमिका घ्यावी असं राऊत यांनी म्हटलं आहे.

सीमा प्रश्नावर पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांनी मध्यस्ती करावी असेच आमचे मत आहे. जर दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांना घेऊन ते बैठक घेणार असतील आणि त्यातून काही सकारात्मक होणार असेल तर कोणी त्यावर टीका करण्याची गरज नाही. बेळगावसह ५६ गावातील भाग केंद्रशासित करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. अमित शहा यांनी गेल्या ७० वर्षापासून मराठी लोकांवर होणार्‍या अन्यायासंदर्भात निर्णय घ्यावा. आपल्या सर्वांना माहिती आहे की ते महाराष्ट्राचे जावई आहेत, त्यांच्या पत्नी कोल्हापूरच्या आहेत आणि सीमावादाचे सर्वात जास्त चटके कोल्हापूरला बसतात. यामुळे सर्वात जास्त संघर्ष कोल्हापूरात होतो. कोल्हापूर ही अमित शहांची सासूरवाडी आहे त्यामुळे त्यांनी हा प्रश्न सोडवावा अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली.

अमित शहा हे कोल्हापूरचे जावाई आहेत. याचा खुलासा खुद्द अमित शहा यांनीच केला होता. याबाबत बोलतांना भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकात पाटील एकदा म्हणाले होते की, अमित शहा हे कोल्हापूरचे जावाई आहे, हे अमित शहांनीच त्यांना सांगितले होते. कोल्हापूरच्या पद्माराजे गर्ल्स हायस्कुलमध्ये शिकलेल्या सोनल शहा यांच्यासोबत त्यांच लग्न झालं आहे. त्यामुळे कोल्हापूर सोबत त्यांचं वेगळंच नातं राहिलं आहे. जे जेव्हाही कोल्हापूर किंवा जवळपास येतात तेंव्हा महालक्ष्मी मंदीरात जावून दर्शन घेतल्याशिवाय राहत नाहीत. काही वर्षांपुर्वी त्यांच्या पत्नी सोनल शहा या कोल्हापूरात आलेल्या. शाळेतल्या मैत्रीणांना त्या भेटल्या होत्या.