महाराष्ट्रात महायुती का मविआ ? वाचा काय आहे ओपिनिय पोल

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथीमुळे सर्वच राजकीय गणितं बिघडले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये झालेली फोडाफोडी, मराठा आरक्षणाचा वादामुळे महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय कलाचा अंदाज घेणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका सर्व्हेमधून महाराष्ट्रामध्ये भाजपा, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या महायुतीला किती जागा मिळतील? याची माहिती समोर आली आहे.

झी न्यूज-Matrize  च्या या सर्व्हेनुसार लोकसभा २०२४ मध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला तब्बल ४५ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडीला केवळ ३ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे भाकित या सर्व्हेमधून करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीने महाराष्ट्रात ४१ जागा जिंकल्या होत्या. तर २०१४ मध्ये महायुतीच्या खात्यात ४२ जागा आल्या होत्या.

या सर्व्हेमधील इतर अंदाजांनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला ८० पैकी तब्बल ७८ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर देशभरात मिळून भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला एकूण  ५४३ जागांपैकी ३७७ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला केवळ ९४ जागांवर समाधान मानावे लागेल तर इतर पक्षांना ७२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.