Maharashtra Politics News : पुन्हा राजकीय भूकंप ? छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांसोबत; चर्चांना उधाण…

Maharashtra Politics News : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्याजवळील चाकणमध्ये त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार उपस्थित राहणार आहेत. विशेष म्हणजे, या कार्यक्रमात दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर दिसणार आहेत.

दरम्यान, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त साताऱ्यातील नायगाव येथे आयोजित कार्यक्रमात छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. फडणवीस चालकाच्या बाजूच्या सीटवर तर भुजबळ मागच्या सीटवर बसल्याचं दिसून आलं.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी पक्षाच्या अंतर्गत घडामोडींवर अनेकदा नाराजी व्यक्त केली असून अजित पवार यांनाही लक्ष्य केलं आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळ ढवळून निघालं होतं. आता मुख्यमंत्र्यांसोबत एकाच गाडीतून प्रवास केल्याने या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.

विशेष म्हणजे, चाकणमधील पुतळा अनावरण सोहळ्यात अजित पवार अनुपस्थित राहणार असल्याची माहिती मिळाली आहे. ते परदेशात असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.

चाकणमधील अनावरण सोहळ्यात छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला अधिक राजकीय रंगत येणार आहे.