महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडींची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटामध्ये सर्व काही आलबेल नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजीनाम्याच्या चर्चेपासून पक्षाच्या बैठकीत सत्तेत सहभागी होण्याच्या मुद्द्यापर्यंत अनेक गोष्टींनी जोर धरला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पक्षात दोन स्पष्ट मतप्रवाह आहेत.
एका गटाचे मत आहे की पक्षाने थेट सत्तेत सहभागी व्हावे, तर दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटात पक्षाचे विलीनीकरण करून सत्तेत जावे. या चर्चेमुळे राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.
याच दरम्यान, शिवसेनेचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केला आहे. पुढील महिन्याभरात महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होईल, असे भाकीत त्यांनी वर्तवले आहे.
मंत्री संजय शिरसाट यांनी शरद पवार गट महाविकास आघाडीत राहणार नाही आणि लवकरच सत्तेत सहभागी होईल, असा दावा केला आहे.
संजय शिरसाट काय म्हणाले?
“खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीत मिठाचा खडा टाकला आहे. त्यामुळे काँग्रेसलाही महाविकास आघाडीची गरज नाही. शरद पवारांची भूमिका दिवसेंदिवस बदलताना दिसत आहे. त्यामुळे त्यांना सत्तेत जायचे आहे, हे स्पष्ट होते. महिन्याभरात शरद पवार गट युतीत सहभागी होईल किंवा अजित पवार यांच्यासोबत जाईल,” असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
त्यांच्या या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पुढील काही दिवसांत शरद पवार गटाचे पाऊल कोणत्या दिशेने पडते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.