मुंबई : अजित पवारांच्या बंडखोरीने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. रविवारी अजित पवार स्वत: शिंदे सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या 8 नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांचा एक मोठा गट सोबत असल्याचा अजित पवार यांचा दावा आहे. सध्या अजित पवारांसोबत प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील हे नेते मंचावर एकत्र दिसतायत. अजित पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदार, नेत्यांनी आपणच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे पुढच्या काही दिवसात ही राजकीय लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.
काल अजित पवार यांनी जयंत पाटील यांना हटवून त्यांच्याजागी सुनील तटकरे यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड केली. त्याशिवाय प्रतोद, प्रवक्त्याच्या नेमणूका जाहीर केल्या. शरद पवार यांच्या गटाने विरोधी पक्षनेतेपदी जितेंद्र आव्हाड यांची नेमणूक केली आहेत. जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड दोघांना अपात्र ठरवण्यासाठी अजित पवार गटाने पावल उचलली आहेत.
अजित पवार यांनी काय पावल उचलली?
शरद पवार गटाकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड सूत्र हलवतायत. आता उपमुख्यमंत्री अजित पवारही Action मोडमध्ये आले आहेत. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. अजित पवार यांनी त्यांच्यासोबत येण्यात आवाहन केलं आहे. अनेक जिल्ह्यात बैठका घेऊन अध्यक्ष त्यांचा निर्णय कळवणार आहेत.
येत्या 5 तारखेला अजित पवार यांनी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीसाठी अजित पवारांकडून हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीला येण्याचं आवाहन केलं आहे. अजित पवारही स्वतःच्या संघटना मजबुतीसाठी मैदानात उतरले आहेत.