आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सु्द्धा करण्यात येत आहे. लोकसभेसाठी महायुतीचं जागावाटप होणं अद्याप बाकी आहे. मात्र, त्याआधीच शिंदे गटातील काही खासदारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याचे उच्चपदस्थ सूत्राने सांगितले
नुकत्याच ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळालं होतं. ५ पैकी ३ राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली होती. हीच बाब लक्षात घेता शिंदे गटातील खासदारांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हापेक्षा भाजपचं कमळ चिन्ह अधिक प्रभावी ठरेल, असं शिंदे गटातील काही खासदारांचं मत आहे. त्यामुळे आम्हाला कमळ चिन्हावरच निवडणूक लढू द्या, अशी विनंती त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
दुसरीकडे शिंदे गटाच्या खासदारांची ही मागणी भाजपला मान्य नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. शिंदे गटातील खासदारांनी जर कमळ चिन्हावर निवडणूक लढवली, तर त्याचा ठाकरे गटाला जास्त फायदा होईल, असं भाजपचं मत आहे. त्यामुळे त्यांनी या मागणीला नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांना १८ पैकी १३ खासदारांनी पाठिंबा दिला. या सर्व खासदारांना आता लोकसभा निवडणुकीत भाजपने पाठिंबा द्यावा, अशी शिंदे गटाची भूमिका आहे. मात्र, भाजपचा याला विरोध असून निवडणुकीत सर्व जागा सोडण्यासही नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.