मुंबई । नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील सलून आणि ब्युटी पार्लरच्या ग्राहकांना झटका बसलाय. महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनने आज म्हणजेच १ जानेवारी २०२५ पासून सलून आणि ब्युटी पार्लरच्या सेवांवर २० ते २५ टक्क्यांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता केस कापणे, दाढी करणे, हेअर कलर, फेशियल, क्लीन अप, स्मुथनिंग, हेड मसाज, मेनिक्यूर आणि पेडीक्युर यासारख्या सर्व सेवांसाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
हे आहेत कारण?
वाढती महागाई, जीएसटी वाढ, इन्कम टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, महानगरपालिकेने वाढलेलं परवाना शुल्क आणि सलूनमध्ये वापरल्या जाणार्या वस्तूंचे वाढलेले दर यामुळे ही दरवाढ करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, असे सलून संघटनेने सांगितले आहे.
“वाढती महागाई आणि विविध करांमध्ये झालेल्या वाढीमुळे आमच्या व्यवसायावर खूप दबाव आला आहे. आम्हाला ही दरवाढ करणे अपरिहार्य झाले आहे,” असे महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचे अध्यक्ष म्हणाले.
दरवाढीचे प्रमाण
हेअर कट आणि दाढी यासाठी २० टक्के दरवाढ केली जाणार आहे, तर हेअर कलर, क्लीन अप, फेशियल, स्मुथनिंग, कॅरीटीन, हेड मसाज, मेनिक्यूर आणि पेडीक्युर यासारख्या सेवांसाठी ३० टक्के दरवाढ केली जाणार आहे.
ग्राहकांवर परिणाम
या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला जोरदार धक्का बसणार आहे. सध्या साध्या सलूनमध्ये केस कापण्यासाठी १०० रुपये आणि दाढी करण्यासाठी ५० रुपये आकारले जातात, तर एसी सलूनमध्ये हेच दर अनुक्रमे २०० आणि १०० रुपये असतात. हायफाय सलूनमध्ये केस कापण्यासाठी ५०० रुपये आणि दाढी करण्यासाठी २०० रुपये आकारले जातात. आता या दरात २० ते ३० टक्क्यांची वाढ होणार आहे.