मुंबई : राज्यात गत सप्ताहापासून बेमोसमी पावसाने थैमान घातले आहे. परिणामी शेतपिकांना मोठा फटका बसला असून, याचे पंचनामे होत नाहीत तोच, पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे.
राज्यात मे महिन्याच्या सुरूवातीलाच तप्त उन्हाचा तडाखा असतानाच, गत सप्ताहापासून बेमोसमी पावसाने थैमान घातले आहे. यात रब्बी हंगामातील केळी बागायती पिकांसह ज्वारी, बाजरी, मका आदी शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
या नुकसानीची पाहणी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी करीत पंचनामे करण्यास सुरवात करण्यात आली आहे. मात्र याचे पंचनामे होत नाहीत तोच, पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता ‘आयएमडी’ने व्यक्त केली आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाचे वातावरण कायम राहणार असून, अनेक भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या राज्यांनाही पावसाचा इशारा
‘आयएमडी’ने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, उत्तर -पश्चिम, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आहे. तर
केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट तर काही ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आसाम, मेघालय आणि अरुणाचल प्रदेशमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, पाऊस जास्त झाल्यास पूर परिस्थितीची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे.