Maharashtra Weather Update: शनिवारी (२६ एप्रिल) देशभरातील हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. महाराष्ट, मध्य प्रदेश आणि राजस्थानसह २४ राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. महाराष्ट्रातील सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, जिल्ह्यांत आजपासून ४ दिवस वादळी पावसाचा अंदाज असल्याने दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी रविवारी गारपीटीचा अंदाज हवामान विभागाने दिला. तर भंडारा, गोंदीया काही ठिकाणी जिल्ह्यात सोमवारी गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
बिहार, झारखंड आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये गारपिटीची शक्यता
२६ ते २९ एप्रिल दरम्यान बिहार, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडच्या अनेक भागात वादळ, गारपीट आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. २६-२७ एप्रिल रोजी सिक्कीममध्येही खूप मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. वादळाच्या काळात शेतकऱ्यांना त्यांची पिके सुरक्षित ठिकाणी नेण्याचा आणि घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये तापमान वाढणार
आयएमडीचा अंदाज आहे की येत्या काही दिवसांत पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि राजस्थानमधील तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते. तर पूर्व भारतातील तापमान सध्या स्थिर राहील. तथापि, उत्तर प्रदेशात, ३ दिवसांनी तापमानात थोडीशी घट दिसून येऊ शकते, ज्यामुळे लोकांना काही दिलासा मिळू शकतो.