Maharashtra Winter : थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी : यवतमाळसह धुळे येथे पारा ७.५ अंशांपर्यंत 

Maharashtra Winter :  उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. तेथून महाराष्ट्राच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी यंदाच्या हिवाळ्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान यवतमाळ येथे ८.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
विदर्भात सर्वदूर गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात तापमान घसरल्याने थंडी वाढत आहे. बुधवारी (ता. २०) पूर्व राजस्थानमधील सिकर येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानचा काही भाग, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये अनेक भागांत किमान तापमान ४ ते ८ अंशांदरम्यान आहे.

 

पंजाबमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुके पडले आहे. राज्याच्या किमान तापमानातही घट कायम असल्याने विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी भरली आहे. मराठवाडा, उर्वरित मध्य महाराष्ट्रात थंडी वाढत आहे.

किमान तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली आल्यास, तसेच दिवसाच्या सरासरीपेक्षा तापमानात ४.५ अंशांपेक्षा अधिक घट झाल्यास थंडीची लाट आल्याचे समजले जाते. बुधवारी (ता. २०) यवतमाळ येथे ८.७ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले असून, सरासरीपेक्षा ५.४ अंशांची घट झाली आहे.

यवतमाळसह धुळे येथेही पारा ७.५ अंशांपर्यंत घसरल्याने थंडीच्या लाटेची परिस्थिती आहे. कोकणासह दक्षिणेकडील जिल्ह्यात किमान तापमान अद्यापही १५ अंशांच्या वर आहे. गुरुवारी (ता. २१) विदर्भासह राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये नोंदले गेलेले किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) –

पुणे १२,

धुळे ७.५,

जळगाव ११.७,

कोल्हापूर १६,

महाबळेश्वर १२.९,

नाशिक १४.४,

निफाड ११.२,

सांगली १५.८,

सातारा १५.१,

सोलापूर १५.५,

सांताक्रूझ २१.२,

डहाणू १९.५,

रत्नागिरी २४.४,

छत्रपती संभाजीनगर ११.४,

नांदेड १४,

परभणी १२.७,

अकोला ११.४,

अमरावती १०.६,

बुलडाणा ११, ११,

चंद्रपूर ९.४,

गडचिरोली ९.६,

गोंदिया ९.२,

नागपूर ९.८,

वर्धा ११.४,

वाशीम ९.८,

यवतमाळ ८.७.