संसदेत गोंधळ घालणारा तरुण महाराष्ट्राचा!

नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान आज लोकसभेमध्ये धक्कादायक घटना घडली असून, दोन तरुणांनी संसदेची कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीमधून सभागृहात उड्या मारल्या. तसेच तानाशाही नही चलेगी अशा घोषणा देत गोंधळ घातला. या तरुणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच संसदेच्या आवारातही एका तरुणाने स्मोक कँडल पेटवून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, यापैकी एक तरुण महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याचं नाव अमोल शिंदे असल्याचं समजते.

दोन तरुण आणि एक तरुणी अशा तिघांनी लोकसभा आणि संसदेच्या आवारात हा गोंधळ घातला असून, त्यांनी म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या नावाने पास बनवू संसदेत प्रवेश मिळवल्याची माहिती समोर आली आहे. संसदेत गोंधळ घालणाऱ्या एका तरुणाचं नाव सागर असं असल्याची माहिती काही खासदारांनी दिली आहे. तर त्यांच्यासोबत असलेल्या महिलेचं नाव नीलम सिंह असून, ती हरियाणातील हिसारमधील असल्याची माहिती समोर येत आहे. तर तिसरा अमोल शिंदे हा तरुण महाराष्ट्रातील लातूर येथील असल्याचे समोर आले आहे.

पाकिस्तानी दहशतवाद्यांनी १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला केला होता. आज संसदेवरील हल्ल्याला २२ वर्ष होतायेत. त्यात आजच ही अक्षभ्य चूक सभागृहात घडली त्यामुळे नवीन संसद भवनाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आधी संसद भवनाबाहेर निदर्शन करणाऱ्या २ जणांना ताब्यात घेतले त्यानंतर काही क्षणातच अन्य दोघांनी थेट सभागृहात घुसखोरी केली. या घटनेनंतर संसदेत पळापळ झाली.

संसदेवरील हल्ल्याचा दिवस अन् पन्नूची धमकी

अलीकडेच खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूने संसद भवनावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संसदेची सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली होती. परंतु तरीही २ आंदोलक संसदेच्या बाहेर घोषणाबाजी करताना दिसले. त्यांच्या हातात टायर गॅस कंटेनर होता. त्या दोघांना सुरक्षा रक्षकांनी पकडले. त्यात १ पुरुष आणि १ महिला होती. परंतु त्याच्या काही क्षणातच पुन्हा एकदा सूरक्षेत चूक झाली. २ युवक लोकसभा सभागृहात घुसले. या दोघांनी गॅलरीतून उडी मारली. त्यांच्याकडून काहीतरी सभागृहात फेकण्यात आले.ज्यातून गॅस बाहेर आला. खासदारांनी या तरुणांना पकडले आणि सुरक्षारक्षकांनी त्यांना ताब्यात घेतले.