मुंबई : शिंदे गटाच्या १६ आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी बुधवारी निकाल येणार आहे. विधानसेभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदारांच्या अपात्रेसंबंधी निकाल देतील. एकनाथ शिंदे यांच्यावही अपात्रतेची टांगती तलवार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलेलं आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाला जून २०२२ मध्ये सुरुवात झाली. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेतील काही आमदारांनी वेगळी चुल मांडत गुवाहाटी गाठली. या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेना पक्षाचे व्हीप असलेल्या सुनील प्रभू यांनी आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला होता. त्या व्हीपचं पालन न केल्यामुळं शिवसेनेकडून १६ आमदारांच्या निलंबनाच्या याचिका तत्कालीन विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पाहणारे नरहरी झिरवाळ यांच्याकडे सादर केल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०२३ मधील निकालानंतर ही जबाबदारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर आली.
राहुल नार्वेकर यांच्या निर्णयाकडे लक्ष
सुप्रीम कोर्टानं महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या प्रकरणावर निकाल देताना आमदार अपात्रतेचा अधिकार अध्यक्षांचा आहे म्हणत त्यांच्यावर ती जबाबदारी सोपवली होती. सुप्रीम कोर्टानं त्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देखील जारी केल्या होत्या. मे २०२३ मधील निकालानंतर आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय घेण्याचे अधिकार राहुल नार्वेकर यांना मिळाले होते.
विधानसभा अध्यक्षांच्या आमदार अपात्रता प्रकरणातील कार्यवाहावीर सर्वोच्च न्यायालयानं देखील नाराजी व्यक्त केली होती. अखेर न्यायालयातील लढाईनंतर सुप्रीम कोर्टानं राहुल नार्वेकर यांना शिवसेनेच्या १६ आमदारांच्या निलंबनाचा निर्णय ३१ डिसेंबरपूर्वी घेण्यात यावा, अशा सूचना दिल्या. राहुल नार्वेकर यांनी निकालाचं लेखन करण्यासाठी म्हणून वेळ वाढवून १० जानेवारी घेतला. आता त्या प्रमाणं राहुल नार्वेकर आमदार अपात्रता प्रकरणात काय निर्णय देतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.
निकालापूर्वी काय म्हणाले राहुल नार्वेकर
निकालापूर्वीच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट संकेत दिले आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यघटनेच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य वापर करणार असल्याचं म्हटलंय. राहुल नार्वेकर म्हणाले की, आजचा निकाल हा मुलभूत हक्कासंदर्भातला महत्त्वाचा निर्णय असणार आहे. यामध्ये कुठल्याही त्रुटी राहणार नाहीत, अशी काळजी आम्ही घेतली आहे. कायद्याचं तंतोतंत पालन केलं जाईल आणि निकालामधून सर्वांना न्याय मिळेल.
अपात्रतेची टांगती तलवार असणारे आमदार
१. एकनाथ शिंदे
२ .अब्दुल सत्तार
३. संदीपान भुमरे
४. संजय शिरसाट
५. तानाजी सावंत
६. यामिनी जाधव
७. चिमणराव पाटील
८.भरत गोगावले
९.लता सोनवणे
१०. प्रकाश सुर्वे
११. बालाजी किणीकर
१२. अनिल बाबर
१३. महेश शिंदे
१४. संजय रायमूलकर
१५. रमेश बोरणारे
१६. बालाजी कल्याणकर