अभिमानास्पद! रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान

मुंबई : टाटा समूहाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ उद्योगपदी रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते रतन टाटा यांच्या निवासस्थानी पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचा पहिला मानाचा पुरस्कार रतन टाटा यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

उद्योग मंत्री उदय सामंत यांनी यापूर्वी विधान परिषदेत याबाबत माहिती दिली होती. महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. दरम्यान, पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्र भूषण पुरस्कार साहित्य, कला, विज्ञान या क्षेत्रामध्ये अलौकिक कामगिरी करणाऱ्यांना प्रदान करण्यत येतो. याच धर्तीवर यावर्षीपासून उद्योगरत्न पुरस्कार देण्यात येत आहे. टाटा समूह भारतातील सर्वात जुना आणि सर्वात मोठ्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक आहे. देशाला पुढे नेण्यात रतन टाटा यांचा मोठा वाटा आहे. तसंच टाटा समूहाची मोठी भरभराट रतन टाटा यांनी आपल्या कारकिर्दीत करून दाखवली.