जळगाव : लाचखोरीचे प्रकार दिवासेंदिवस वाढतच असल्याचे दिसत असून अशातच जळगावमधून लाचखोरीची मोठी बातमी समोर आली आहे. महावितरणच्या कंत्राटी वायरमनला एक लाख रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना जळगाव लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री १० वाजता सापळा रचून अटक केली आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) असे वायरमनचे नाव असून याबाबत जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे
याबाबत असे की जळगाव शहरातील ५३ वर्षीय तक्रारदाराने नवीन घस बांधकाम केलं असून या घराला वीज मीटर अर्ज केला होता. परंतु त्यांना मीटर बसवून भेटलं नव्हते. दरम्यानच्या काळात त्यांच्या घराला MSEB जळगांवच्या पथकाने भेट दिली होती. या भेटीनंतर त्यांना आता ४ लाख ६० हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल असा निरोप कंत्राटी वायरमन यांनी दिला होता. त्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता १ लाख ६० हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवतो असे सांगून लाचेची मागणी केली होती.
त्यानंतर तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पंचा समक्ष पडताळणी केली असता कंत्राटी वायरमन यांनी तडजोडी अंती १ लाख ४० हजार रुपयांची मागणी करून पंचा समक्ष १ लाख रुपये आज रोजी स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. प्रशांत विकास जगताप (वय ३३) यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येत आहे.