---Advertisement---
धुळे : शहरात वीज चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. शहरातील अनेक भागांमध्ये मीटरशिवाय थेट विजेचा वापर केला जात आहे. या वाढत्या वीज चोरीमुळे महावितरणला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, तसेच प्रामाणिकपणे वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांवरही याचा भार पडत आहे. या वाढत्या प्रकारांना रोखण्यासाठी आता महावितरणकडून कठोर कारवाई केली जात असून, वीज चोरांविरुद्ध गुन्हे दाखल केले जात आहेत.
धुळे शहरात वीज चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. महावितरणतर्फे सर्वत्र अत्याधुनिक टीओडी बसविले जात आहे. असे असतांना महावितरणच्या पथकाला दोघांनी मीटरमध्ये फेरफार करीत वीज चोरी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या दोघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीज चोरी रोखण्यासाठी महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी मीटर सर्वत्र बसविले जात आहेत. टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट आहे. हे महावितरणाच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो. मीटर नादुरुस्त झाल्याची तसेच मीटरमध्ये कुणी फेरफार केला तर त्याची थेट माहिती त्याच क्षणी महावितरणाला मिळत आहे.
धुळे जिल्ह्याच्या विविध भागात महावितरणाने गेल्या काही दिवसांत विशेष पथकाद्वारे केलेल्या तपासणीत टीओडी मीटरमध्ये वीजचोरी केल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. महावितरणाच्या लालबाग कक्षाचे सहायक अभियंता हे कार्यालयीन सहकाऱ्यांसह वीजजोडणी तपासणी करत असताना मच्छीबाजार येथे मोहम्मद सलीम मोहम्मद मुस्तफा या ग्राहकाचे वीजमीटर व वीज वापराची तपासणी तसेच वीजपुरवठ्याची व संपूर्ण जोडभाराची तपासणी केली असता, त्या ठिकाणी वीजचोरी सुरू असल्याचे निदर्शनास आले.