जामनेर : हिंगोणा (ता. यावल) येथील प्रतिष्ठीत व्यापारी चंपालाल तथा निर्मलाबाई यांची नात तसेच प्रदीप तथा सुनीता बोरा यांची मुलगी महिमा प्रदीप बोरा हिने जीवनातील सर्व भौतिक सुखाचा त्याग करीत मोक्ष मार्ग अवलंबला आहे.
इंटेरियर डिझाईनर शिक्षण घेतलेल्या अवघ्या वयाच्या २५ व्या वर्षी संसाराचा त्याग करणार आहे. बाल ब्रह्मचारी असलेल्या महिमा सर्वच सुखाचा त्याग करत मोक्ष प्राप्तीच्या मार्गावर जाण्याचा मनाशी ठाम निश्चय केला आणि तो सत्यातही उतरवला. १९ एप्रिल रोजी बुलढाणा येथे महिमा ही जैन धर्मशास्त्रानुसार दीक्षा घेणार आहे. मुमुक्षु महिमासह अन्य मुमुक्षुचा दीक्षा समारंभ प. पू. कानमुनिजी म. सा.. प. पू. गुलाबमुनीजी म. सा. यांचे शिष्य प. पू. पंकजमुनीजी म. सा. यांच्या मुखरविंदाने दीक्षा ग्रहण करणार आहे.
बहिणीचा घेतला आदर्श
हिंगोणा या छोट्याशा गावात अवघे चार कुटुंब जैन बांधव राहतात. तेही चार भावंडांचे घर आहे. गेल्या २० वर्षा अगोदर येथील मोतीलाल बोरा यांची नात हिने वयाच्या २४ व्या वर्षी दीक्षा घेतली. त्या लालीमाश्रीजी म. सा. म्हणून परिचित आहे. समाजाचा प्रचार प्रसार करीत आहे. समर्पिताजी म.सा. आदी ठाणा चारमध्ये लालीमाश्री म.सा. देखील आहे. महिमा बोरा हीदेखील याच्या सानिध्यात दीक्षा घेत आहे. लालीमाश्रीजी म.सा. या माहिमाच्या बहीण असून त्यांच्या आदर्श घेत तिने दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
फेसबूक, इंस्टाग्रामच्या युगात
आजच्या आधुनिकतेच्या युगात लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत इंटरनेटवरशी जोडलेले आहे. फेसबुक, इंस्टाग्रामसह व्हॉट्सअॅप सारख्या आधुनिकतेकडे पिढी गुंतलेली आहे. सर्वत्र या गोष्टीचा लळा लागलेला असून जीवनाचा एक भाग बनलेला आहे. अशा परिस्थितीतदेखील महिमा या गोष्टीपासून दूर राहून संयमी जीवन अंगिकारले आहे. तिच्या या निर्णयाने सर्वत्र कौतुक होत आहे.
भाऊ प्रसून भावविवश
महिमाला एकच भाऊ आहे. आजी, आजोबा, आई, वडील, भाऊ असा छोटा परिवार आहे. संसाराचा त्याग करून दीक्षा घेत असल्याचा एकीकडे आनंद आहे तर दुसरीकडे बहीण घरी नसणार असल्याचे तसेच रक्षा बंधनाला बहीण महिमा नसणार याचे दुःखदेखील मनात आहे. मात्र आज तिने घेतलेला निर्णय सर्वासाठी अभिमानास्पद आहे.
इतरांच्या घराची डिझाईन आखता आखता स्वतःच्या आयुष्याची डिझाईन आखली
महिमा स्वतः इंटेरियर डिझाईनर असून इतरांच्या घरात विविध डिझाईन मनात आखून घर कसे स्वच्छ, सुंदर, पवित्र्य बनेल अशी कल्पना मनात ठेवत शिक्षण पूर्ण केले. महिमा २०२१ मध्ये पहूर गावी सुरू असलेल्या समर्पिताजी म. सा. यांच्या चातुर्मासानिमित्त दर्शना गेली. तेथे प्रवचन ग्रहण केले. त्यांचे आचार-विचार श्रवण करून स्वतःच्या वैराग्याची वाट मोकळी करून घेतली. तेव्हापासून गुरू महाराजांच्या सानिध्यात धर्माची शिकवण घेतली. वैराग्य भावनेत राहत असताना दीक्षा घेण्याचा मानस अंगीकारला आणि हे जीवन क्षणभंगुर आहे, जेव्हा महिमाला कळाले आणि तेव्हापासून ती आपल्या आयुष्याची डिझाईन स्वतः आखली. आपल्या जीवनाचे कृतार्थ घडवित जैन धर्मियांची दीक्षा घेणार आहे.