जळगाव : विवेकानंद नगरातील डॉ. प्रकाश चित्ते यांच्या घरातून २० लाख रुपयांची रोकड आणि ५२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्किट चोरल्याप्रकरणी मोलकरीण छाया संग्राम विसपुते (४५) हिला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवार, २९ रोजी सायंकाळी अटक केली.
मे ते डिसेंबर २०२४ या कालावधीत छाया विसपुतेने डॉक्टर दांपत्याच्या अनुपस्थितीत चोरी केल्याचे उघड झाले. चोरीची माहिती समजल्यानंतर डॉ. चित्ते यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे यांनी संशयित मोलकरणीची चौकशी केली असता, तिने चोरीची कबुली दिली.
चोरीचा गुन्हा उघड
पोलिस तपासात स्पष्ट झाले की, डॉक्टर दिवसभर रुग्णालयात असताना मोलकरीण घरातील कपाटातून ठराविक रक्कम चोरत असे. आठ महिन्यांच्या कालावधीत तिने २० लाख रुपयांची रोकड आणि चार लाखांच्या सोन्याच्या बिस्किटांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
पैशांबाबत संपूर्ण माहिती
डॉ. चित्ते यांच्या घरात काम करणाऱ्या छाया विसपुतेला डॉक्टरांच्या आर्थिक व्यवहारांची माहिती होती. सकाळी पावणेआठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत काम करणारी मोलकरीण, पती-पत्नीच्या अनुपस्थितीत घरातील कपाटातून चोरी करत होती. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छाया विसपुतेला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.