दुर्घटना : दोन ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघात; ६ जणांचा जागीच मृत्यू

तरुण भारत लाईव्ह | मलकापूर : शहरातील महामार्ग क्रमांक सहावर दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे. आज २९ जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डान पुलावर हा अपघात झाला असून सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर साधारण 30 जण जखमी झाल्याचे समजते. यामधील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार एमएच 08-9458 ही अमरनाथची तिर्थयात्रा करुन ही ट्रॅव्हल्स हिंगोलीच्या दिशेने जात होती. या ट्रॅव्हल्समध्ये 35 ते 40 तिर्थयात्री होते. तर एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. ही ट्रॅव्हल्स नागपूरवरुन नाशिकच्या दिशेने जात असताना मलकापूर शहरातून जाणाऱ्या महामार्ग क्रमांक सहावरती समोरासमोर धडकून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दोन्ही ट्रॅव्हल्स समोरासमोर भिडल्याने अक्षरशा चिरडल्या गेल्या. या भीषण अपघातात सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन्ही ट्रॅव्हल्समधील ते 30 प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सी चे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तातडीनं मदत कार्य सुरू केले आहे.

 

मलकापूर येथे झालेल्या अपघातानंतर जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध झाली नाही. त्यामुळं पोलिसांच्याच वाहनातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ज्या प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे, त्यांना बुलढाण्यातील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल्याची माहिती आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रकरणाचा तपास सुरू असून अपघाताचं कारण पोलिसांकडून शोधण्यात येत असल्याची माहिती आहे.