नंदुरबारमध्ये कुपोषणाची समस्या गंभीर; आकडेवारी धडकी भरवणारी

नंदुरबार : राज्यात कुपोषित बालकांची संख्या 28 हजार असून त्यापैकी 23 हजार बालके एकट्या नंदुरबार जिल्ह्यात आहेत, नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न गंभीर  झाला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयामधील अपूर्ण साधनसामुग्री आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूच्या प्रमाणात वाढ झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे आमदार आमश्या पाडवी यांनी केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण आणि बालमृत्यूची समस्या गंभीर असून जिल्हा रुग्णालयात असलेल्या सुविधा अपूर्ण आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात 20 जागांची क्षमता असताना 84 बालके उपचार घेत असल्याचा गंभीर प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे. जिल्हा रुग्णालयातील रिक्त पद आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण  वाढले असल्याचा आरोपही पाडवी यांनी केला आहे.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीला जाण्यासाठी वेळ आहे, मात्र आदिवासींच्या समस्या ऐकून घेण्यासाठी वेळ नसल्याचा आरोपही त्यांनी केला. आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी असलेल्या ट्रायबल अॅडवायजर कमिटीची बैठक पाच वर्षात झाली नसून या महिन्यात दोन वेळेस बैठकीसाठी वेळ देऊनही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे सरकार आदिवासींच्या प्रश्नांवर किती गंभीर आहे हे दिसून येतंय असंही आमदार पाडवी म्हणाले.