कुपोषण हद्दपार करण्यासाठी जिल्ह्यात तातडीने उपाययोजना राबवा

तरुण भारत लाईव्ह न्युज  जळगाव: जिल्ह्यातून कुपोषण हद्द पार करण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. कुपोषण निर्मुलनासाठी 15 दिवसात धडक मोहिम राबवून कुपोषीत बालकांचे त्वरीत सर्वेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिल्या. कुपोषणासंदर्भात प्रकल्प अधिकारी, वैद्यकीय अधिकारी यांची नुकतीच जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पोषणस्थितीचा आढावा घेतला.

आजारी बालकांना त्वरीत वैद्यकीय सेवा उपलब्ध करा. सहा महिन्यात जिल्ह्यातील कुपोषीत बालकांना साधारण श्रेणीत आणण्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी कुपोषीत बालकांसाठी ग्राम बालविकास केंद्र, बालक उपचार केंद्र, पोषण पुर्नवर्सन केंद्र यांच्या माध्यमातून उपचारात्मक आणि प्रभावात्मक काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनीही बैठक घेऊन कुपोषण निर्मूलनासाठी धडक मोहिम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने जि.प.च्या महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभागाकडून सुंयक्तपणे पथकांची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामाध्यमातून जिल्ह्यात कुपोषीत बालक शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यात 0 ते 6 वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी व बालकांचे रक्तही तपासून त्यातील हिमोग्लोबीनच्या पातळीचीही नोंद घेतली जाणार आहे. तसेच बालकांच्या लसीकरणाचीही खात्री केली जाणार आहे. 7 जून ते 21 जून या काळात ही मोहिम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात बालके कुपोषण मुक्त व्हावीत यासाठी जिल्हा यंत्रणेने युध्दपातळीवर पावले उचलण्याचे आदेश दिल्याने यंत्रणा कामाला लागली आहे. त्यामुळे लवकरच जिल्हा कुपोषण मुक्त होईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील कुपोषीत बालकांचा शोध घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमन मित्तल आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार दोन आठवडे धडक मोहिम राबविण्यात येत आहे.त्यासाठी आरोग्य विभाग व महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

– देवेंद्र राऊत, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.जळगाव