---Advertisement---
शहादा : तालुक्यातील म्हसावद येथे स्थानिक पोलिसांनी केलेल्या कारवाईत गावालतील एका घरातून १ लाख १० हजार ५०० रुपयांचे फटाक्यांचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध स्फोटक पदार्थ विनापरवाना बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (२८ ऑगस्ट) रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास, म्हसावद येथील एका गल्लीतील शुभम राजेंद्र चौधरी यांच्या घरात स्फोटक पदार्थ ठेवले असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. छापेमारीदरम्यान, घरात ४९ वेगवेगळ्या कंपन्यांचे फटाक्यांचे बॉक्स आढळून आले. पोलिसांनी आरोपी जगदीश हरचंद्र रामोळे (वय ४२, रा. नवनाथ नगर, खेडदिगर, ता. शहादा) याला ताब्यात घेतले.
जगदिश रामोळे याने शुभम चौधरी यांचे घर भाडेतत्वावर घेऊन त्या घरात त्याने कोणतेही आवश्यक परवाने न घेता हे स्फोटक पदार्थ साठवले होते. या कृतीमुळे त्याने केवळ शासकीय आदेशाचे उल्लंघनच केले नाही, तर परिसरातील लोकांच्या जीवितालाही धोका निर्माण केला.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, म्हसावद पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२५, २२८, २२३ सह स्फोटक पदार्थ (द्रव्य) अधिनियम १८८४ चे कलम ९ (ब) आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३३/१३१ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो. नि. नितिन कामे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील करत आहेत.