जीवन जिज्ञासा
– प्राचार्य प्र. श्री. डोरले
मनाचे स्वरूप
भारतीय तत्त्वज्ञानाच्या वा अध्यात्मशास्त्राचा परंपरेत मानवी (Nature of mind) मनाचे स्वरूप, त्याचे सामर्थ्य याबाबत अनादिकाळापासून चिंतन झाले आहे. वेद, उपनिषद, सर्व श्रुतींचे सारभूत ज्ञान संग्रहित करणारा आपला सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भगवद्गीता! त्यातील दहाव्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी स्वतःच्या विविध विभूतींचे वर्णन करताना असे म्हटले आहे की, ‘इन्द्रियाणां मनश्चास्मि’ म्हणजे इंद्रियांमध्ये मी ‘मन’ आहे तर त्याचबरोबर ‘भूतानास्मि चेतना’ म्हणजे सर्व भूतद्रव्यांमधील जीवनशक्ती म्हणजे चेतना मी आहे.
भगवान श्रीकृष्ण स्वरूप असणारे हे (Nature of mind) ‘मन’ म्हणजे नेमके काय? त्याचे लक्षण कोणते? त्याचे स्वरूप कसे? या विविध संदर्भात अनादिकाळापासून प्रत्येक संस्कृती, समाजातील, देशातील बुद्धिवंत, तत्त्वज्ञ, विचारवंत, संत, साहित्यिक, संशोधक विचार करीत आहेत. त्यावर संशोधन करीत आहेत, पण अद्यापही त्यांना त्या मनाचा निश्चित थांगपत्ता, ठावठिकाणा लागलेला नाही. ते मन दिसत नाही. हाती लागत नाही, आकलनात येत नाही. काय आहे? कसे आहे, हे कळत नाही आणि महत्त्वाची व आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की, त्याच्या सहभागाशिवाय मानवी जीवनाचे एक पाऊलदेखील पुढे पडू शकत नाही. कारण मानवी जीवनाची सर्व ‘प्रगती’ म्हणा वा ‘अधोगती’ म्हणा ही त्या मनावरच आहे. माणसाचा खरा मित्र त्याचे ‘मनच’ आहे आणि त्याचा शत्रूही त्याचेच मन आहे. माणसाचे हे मन ज्यावेळी ‘मित्र’ म्हणून चांगला मार्गदर्शक, सल्लागार म्हणून त्याला मदत करते त्यावेळी त्याची प्रगती होते. त्याचा उद्धार होतो आणि ज्यावेळी हे मन विपरीत विकृत मार्गाने वाटचाल करू लागते त्यावेळी त्याचेच अधःपतन होते. त्याची जीवन नौका बुडते.
हे मन कसे आहे? तर, ते चंचल आहे. प्रमाथी आहे. बलवान आहे. मी-मी म्हणणार्यांना, स्वतःला मोठे सामर्थ्यशाली समजणार्यांना अगतिक, हतप्रभ करणारे, निष्प्रभ करणारे, केविलवाणे करणारे ते आहे. त्याच्या सामर्थ्यासमोर रावणाचे काही चालले नाही. रावण प्रथम आपल्या मनाशी ‘हरला’ आणि नंतर श्री प्रभू रामचंद्रांशी! या (Nature of mind) मनाच्या सामर्थ्यासमोर ‘प्रतिसृष्टी’ निर्माण करण्याचे तपोबल असलेले महर्षी विश्वामित्रही हरले आणि अलगद मेनकेच्या मादक करपाशात अडकले आणि ‘क्षीणपुण्य’ झाले. शब्दवेध करणारा बाण चालविण्यापासून, तो इंद्रापासून दैवी अस्त्रसंपदा म्हणजे ‘दिव्य’ अस्त्रे मिळवणारा धनुर्धर अर्जुनही या मनासमोर अगतिक होऊन काकुळतेने आपली असमर्थता भगवान श्रीकृष्णांसमोर प्रकट करताना म्हणाला- ‘तस्याहं निग‘हं मन्ये वायोरिव सुदुष्करम्’ हे श्रीकृष्णा! मनाला वश करणे हे वार्याला अडविण्यासारखे कठीण आहे.
मानवी मनाचे (Nature of mind) हे सामर्थ्य योगशास्त्रवेत्त्यांनी, दर्शनकारांनी उपनिषदकारांनी, संतांनी पूर्णपणे स्वत:च्या साधनेतून, तपस्येतून प्राप्त अनुभूतीतून ओळखले आणि त्याच मनाच्या साह्याने ‘शेवटचा दिवस गोड केला.’ ती अनुभूती, मनाचे सामर्थ्य त्यांच्या साहित्यांतील विविध रचनांमधून सहज लक्षात येते. या ‘मनाला’ समजविण्यासाठी श्री समर्थांनी ‘मनाचे श्लोक’ लिहिले तर श्री संत तुकोबारायांनीही लोकांना उपदेश करताना भगवद्गीतेने वर्णन केलेले मनाचे सामर्थ्य साध्या शब्दात सांगितले की-
मन करारे प‘सन्न। सर्व सिद्धीचे कारण।
मोक्ष अथवा बंधन। सुख समाधान इच्छा ते॥
मन गुरू आणि शिष्य। करी आपुलेचि दास्य।
प्रसन्न आप आपणास। गति अथवा अधोगती॥
(अभंग गाथा)
असे हे विलक्षण सामर्थ्यशाली मन! ज्या मनाचा मोह वा आकर्षण स्व: भगवान श्रीकृष्णालाही आवरता आला नाही. त्यामुळेच त्यांना म्हणावे लागले की, ‘इंद्रियाणां मनश्चास्मि।’
अशाप्रकारे मानवी जीवनाचे केन्द्रबिंदू असलेल्या ‘मनाचे’ आकर्षण (Nature of mind) आधुनिक संशोधकांना पडले नसते तर नवलच! त्यांनाही ‘मन-मन’ ज्याला म्हणतात ते आहे तरी काय? अशी जिज्ञासा निर्माण झाली. ती जिज्ञासा तृप्त करण्यासाठी त्यांनी या मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला. त्या प‘यत्नांमधूनच मग मन, त्याचे स्वरूप, त्याच्या ठायी असलेले विविध सामर्थ्य, त्याचे शरीरांतर्गत असलेले स्थान इत्यादी विविध प्रकारच्या हेतूने त्याचे संशोधन म्हणजे अभ्यास करण्यास शास्त्रज्ञांनी प्रारंभ केला. त्यासाठी या शोधयात्रेचा मागोवा घेणे जरूर आहे.
मनाचे आधुनिक संशोधन
गोष्ट अठराव्या शतकातील आहे. या शतकात संमोहनशास्त्राचा (मेस्मॉरिझम, हिप्नॉटिझम) उद्गाता डॉ. मेस्मरच्या प्रयोगांमुळे, संशोधनामुळे मनाच्या ठिकाणी असलेल्या शक्तीचा परिचय झाला. त्याच्या प्रयोगातील ‘मानसिक सूचन’ (मेंटल सजेशन) या प्रक्रियेमुळे मानवी मनाच्या अंतरंगात, सखोल निद्रिस्त असलेल्या सुप्त संस्कारांना जागरूक करून, त्यांना जाणिवेच्या (कॉन्शस लेव्हल) पातळीवर आणून गत जन्मातील अनेक सुप्त आणि रहस्यमय गोष्टी समजून घेता येऊ लागल्यात. तसेच 19 व्या शतकात डॉ. फ्राईड यांच्या ‘मनोविश्लेषण वादामुळे (Nature of mind) मनाच्या ठिकाणी असलेल्या ‘अबोध मनाच्या’ स्तरावर (अनकाँशन्स-आस्पेक्ट ऑफ द माईंड) मानसिक तत्त्वाचा अथांग सागर विज्ञान जगताला परिचित झाला. त्याचे अस्तित्व अनुभवायला आल्यामुळे उत्साह वाढला आणि मनाच्या विज्ञानाधिष्ठित संशोधन कार्याने वेग धारण केला. विविध संस्था त्या द़ृष्टीने कार्यरत झाल्यास त्याचा थोडक्यात अहवाल पाहणे इष्ट राहील.
सन 1882 मध्ये ‘सोसायटी फॉर सायकिकल रिसर्च’ ही संस्था लंडनमध्ये स्थापन झाली. सन 1884 मध्ये हीच संस्था अमेरिकेमध्ये कार्य करू लागली. या दोन्ही संस्थांच्या माध्यमातून अनेक संशोधकांनी परा-मानसशास्त्रांशी संबंधित (पॅरा-सायकॉलॉजी) विविध प्रकारचे प्रयोग आणि संशोधन केले. संशोधनाचा हा क्रम सतत 45 वर्षे चालत राहिला. या संस्थेच्या जोडीने प्रसिद्ध संशोधक प्रो. विल्यम मॅक्डुगल, मानसशास्त्रज्ञ, हॉर्वर्ड आणि ड्युक युनिव्हर्सिटी यांनी पुढाकार घेऊन सन 1927 मध्ये ‘इन्स्टिट्यूट फॉर नॉन फिजिकल नेचर ऑफ द मॅन’ या नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेची जबाबदारी त्यांनी प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ आणि परा-मानसशास्त्र संशोधक डॉ. जे. बी. र्हाईन यांच्यावर सोपविली. ते या ज्ञानशाखेतील एक अधिकारी पुरुष समजले जात. या ज्ञानशाखेत ते अनेक वर्षे संशोधन करीत होते. त्यांच्या सखोल अध्ययन, संशोधनातून त्यांनी ‘टेलिपथी’ (विचार संक‘मण) ‘दिव्यद़ृष्टी’ (क्लेयर व्हॉयन्स) या विषयांवर अनेक पुस्तकांचे लिखाणही केले होते. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमातून, संशोधनातून त्यांनी लिहिलेले- ‘एक्स्ट्रा सेन्सरी माईंड’ (अतींद्रिय सामर्थ्याने युक्त असलेले मानवी मन) हे पुस्तक या शास्त्रावरील अतिशय महत्त्वाचे, अधिकृत आणि संदर्भ ग्रंथ म्हणून समजले जाते.
डॉ. जे. बी. र्हाईन यांनी अतिशय निष्ठापूर्वक या संस्थेचे काम केले. त्यांच्या अथक परिश्रमातून त्यांनी राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, विशेषत: संशोधन क्षेत्रात या ‘अतींद्रिय विज्ञानाला’ ‘शास्त्र’ (सायन्स) म्हणून मान्यता प्राप्त करून दिली. हे त्यांचे आधुनिक विज्ञान क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय मोलाचे असे योगदान आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज आधुनिक विज्ञानाच्या ज्या विविध शाखा आहेत त्यांत परा-मानसशास्त्र (पॅरा-सायकॉलॉजी) ही एक अधिकृत ज्ञानशाखा म्हणून मान्यता पावली आहे. तिला अधिकृतता प्राप्त झाल्यामुळे अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान, इंग्लंड या देशातील सर्व प्रमुख विद्यापीठांमधून या (Nature of mind) शास्त्राच्या संशोधनासाठी, अध्ययनासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा, अध्यासने निर्माण करण्यात आली आहेत. त्यांच्या माध्यमातून जगभर आज मानवी मनाचा शोध घेणे चालू आहे. या सर्व प‘योगांना, संशोधनाला आणि त्यातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांना ‘सायंटिफिक’ मान्य करण्यात यावे, असा ठरावच ‘अमेरिकन असोसिएशन फॉर अॅडव्हाँन्समेंट ऑफ सायन्स’ या कौन्सिलने घेतल्यामुळे त्याच्या खरे वा खोटेपणाची चर्चा करण्याचा वा त्यावर वितंडवाद करण्याचा मार्गच आता विज्ञान क्षेत्रात बंद झाला आहे. या ठरावाद्वारे आधुनिक विज्ञानाने जणू मानवी मनाचे ‘स्वतंत्र’ (इन्डिपेंडन्ड एनटीटी) अस्तित्व, त्याचे सामर्थ्य, श्रेष्ठत्व मान्य केले आहे. आतापर्यंतच्या विज्ञानाच्या वाटचालीत जे ‘जड’ आहे, जे ‘भौतिक’ आहे, तेच फक्त ‘खरे’ आणि जे ‘अभौतिक’ आहे, जे दिसत नाही ते ते सारे खोटे. त्याचे अस्तित्व मान्य करण्याचे काही कारणच नाही हा जो ‘एकांगी’ (वनसाईडेड) विचार होता त्याला धक्काच बसला. स्पष्ट सांगायचे म्हणजे ‘जे दिसत नाही, जे दृष्टिगम्य नाही त्याचे अस्तित्व मानण्याचे काही कारणच नाही. या प्रकारच्या जडवादी द़ृष्टिकोनावर विसंबून असलेल्या विज्ञानाच्या वैचारिक आधारालाच धक्का बसला. अतिशय विस्तृत असलेल्या त्या ठरावातील महत्त्वाचा अंश पुढीलप्रमाणे-
“The committee came to the conclusion that the investigation concerning to the field of Non-physical phenomena Just as para-psychology and its other aspects concerning to it… It uses scientific methods of inquiry. Therefore that investigation can be regarded as Scientific” (Extra sensory Mind – मधून)
वरील ठराव सर्वानुमते मान्य झाला. त्याचे वाचन ‘डिन ऑफ द सोसायटी’ डॉ. डग्लस यांनी केले. टाळ्या वाजवून सर्वांनी त्याला मान्यता दिली. ‘‘जडाला सूक्ष्माचा आधार आहे की, सूक्ष्मातून जड निर्माण झाले आहे? जडाचेच फक्त अस्तित्व आहे की, जे दृष्टिगम्य, स्पर्शजन्य नाही त्याचेही अस्तित्व आहे? विज्ञानाच्या क्षेत्रात शेकडो वर्षे जो वाद चालू होता, त्याला मूठमाती मिळाली. दृश्यमान जड देहाप्रमाणेच अदृश्य असलेल्या‘मनाचेही’ अस्तित्व आहे. हे विविध प्रयोगाने सिद्ध झाले.
हे ‘मन’ तरल आहे. सूक्ष्मतम आहे, ते दिसत नाही, पण कार्यरत आहे. ते (Nature of mind) संवेदनशील आहे. पार्याप्रमाणे चंचल आहे. सर्वव्यापी आहे. ते ‘आता’ येथे आहे तर क्षणात कुठेही जाणार आहे. ते ‘जड’ नाही. त्याची खरी अवस्था ‘पाहो जाता सर्वाठांयी- पाहो जाता कोठे नाही?’ असे रात्रीच्या अंधारातील चकव्याप्रमाणे आपल्याशी अखंडपणे ‘लपंडाव’ करणारे मन! द्वापार युगात भगवान श्रीकृष्णाला ‘पछाडणारे’, आधुनिक काळात अनेक वैज्ञानिकांना, संशोधकांना मोहित, आकर्षित करणारे, स्वतःचा त्यांना शोध घ्यायला लावणारे असे हे आपले मानवी मन!