जीवन जिज्ञासा
१८ वे शतक आणि १९ व्या शतकातील विज्ञानाने आपले ‘कॉझ अँड इफेक्ट’ म्हणजे कार्यकारण संबंधात अडकून पडलेल्या ‘जडत्वाचा’ त्याग केला. ते सूक्ष्म झाले. म्हणजे मानवी जीवनाचे केंद्र असलेल्या ‘मनस् तत्त्वाला’ (माईंड स्टफ) ते मान्य करू लागले. त्यांचा अशरीरी (नॉन फिजिकल) असलेल्या कोणत्याही गोष्टीचे अस्तित्वच मान्य करायचे नाही, हा अट्टाहास, दुराग्रह नष्ट झाला. याला निमित्त झाले डॉ. मेस्मर आणि डॉ. फ्राईड यांनी लावलेल्या मनाच्या ठायी अस्तित्वात असलेल्या सूक्ष्म शक्तीच्या शोधांमुळे! त्यांनी लावलेल्या शोधांमधूनच ‘संमोहन शास्त्र’ (हिप्नॉटिझम) आणि अबोध मनाच्या सुप्त आणि अथांग असलेल्या सामर्थ्यावर आधारित ‘परामानस शास्त्र’ म्हणजे ‘अतींद्रिय विज्ञान (पॅरा सायकॉलॉजी) या दोन ज्ञानशाखा विकसित झाल्यात. त्याला ‘विज्ञाननिष्ठ’ (सायंटिफिक) म्हणून मान्यताही मिळाली. १५ व्या शतकापासून प्रारंभ झालेले विज्ञान जे शुद्ध ‘भौतिकवादी’ (मटेरियॅलिस्टिक) होते, जडवादी होते त्याने अतिशय महत्त्वाचे ‘वळण’ घेतले.
ते स्थूलातून सूक्ष्मात शिरले. डॉ. जे. बी. -हाईन, प्रो. विल्यम मॅकडुगल, डिन ऑफ सोसायटी डॉ. डग्लस आणि या सर्वांचे सर्व संशोधक सहकारी यांच्या प्रयत्नातून मानवी मनाचा शोध घेण्याचा, त्याच्या अंतरंगात खोल खोल शिरण्याचा आधुनिकतम सर्व शास्त्रे आणि साहित्याचा उपयोग करून शोध यात्रेचा प्रारंभ झाला. त्यातून ‘न दिसणारे ‘मन’ दिसू लागले. प्रकट होऊ लागले. मनाच्या संशोधन कार्यात संशोधक सर्व शास्त्रे व त्याच्या जोडीने विविध अत्याधुनिक उपकरणे यांचा उपयोग करू लागली. त्यामुळे मनाचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करण्याच्या प्रक्रियेला चांगलाच वेग आला. मनाच्या सुप्त सामथ्र्याचाही संशोधकांना प्रत्यय येऊ लागला. मात्र, हाती आलेल्या वरवरच्या ज्ञानाच्या आधारावर संशोधकांनी लगेच ‘मन’ म्हणजे काय? त्याचे स्वरूप कसे आहे याच्या बंदिस्त स्वरूपाच्या व्याख्याही करण्यास प्रारंभ केला. यात सर्व संशोधकांची अवस्था ‘हत्ती आणि काही आंधळे’ या गोष्टीसारखी झाली. प्रसिद्ध संशोधक डॉ. थॉमस अॅक्विनास यांनी मनाची व्याख्या करताना असे म्हटले आहे की, ‘मन म्हणजे बौद्धिक क्रियांमध्ये प्राधान्यरूपेण महत्त्वाचे असलेले ‘तत्त्व’ (प्रिन्सिपल) आहे. त्यालाच मानवाचा आत्मा (ह्युमन सोल) असेही आपण म्हणतो. हे ‘तत्त्व’ जे आहे त्याला कसलाही आकार नाही. (बॉडिलेस) तरीसुद्धा ते सर्वव्यापी स्वरूपाचे असे (ऑल परव्हेडेड) आहे. हे मन बुद्धीचे इंद्रिय स्वरूपाचे समजले जाते. पण ते शरीराच्या आधाराशिवायही कार्य करू शकते. त्याच्या सहभागाशिवाय कोणतीही क्रिया मात्र घडू शकत नाही.
डॉ. थॉमस यांनी केलेली ही व्याख्या आपल्या तत्त्वज्ञानाशी बरीच मिळती-जुळती आहे. सुसंवादी आहे. शरीर विज्ञान शास्त्राप्रमाणे आपल्या देहव्यापाराची वाटणी ‘कर्मेंद्रिय’ आणि ‘ज्ञानेंद्रिय’ अशी झाली आहे. कर्मेंद्रिये ही बहिरंग साधने आहेत तर ‘ज्ञानेंद्रिये’ ही अंतरंग साधने समजली जातात. या सर्वांचा स्थूलाकडून सूक्ष्माकडे जाणारा क्रम भगवद्गीतेने सहस्त्रावधी वर्षे आधीच सांगून ठेवला आहे. तो असा आहे-
इंद्रियाणी पराण्याहुरिन्द्रियेभ्य: परं मनः।
मनसस्तु पराबुद्धिर्यो बुद्धेः परतस्तु सः।।३।४२।।
म्हणजे- विषयांपेक्षा त्याची अनुभूती घेणारी इंद्रिये श्रेष्ठ आहेत. इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे. मनापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे आणि त्याहीपेक्षा आत्मा श्रेष्ठ आहे. या सूक्ष्म क्रमाने आपल्याला अनुभूती येते. पण या सर्व प्रक्रियेमध्ये ‘मन’ हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. आजच्या संशोधकांच्या लक्षात आता ही गोष्ट लक्षात येऊन ते आता प्रयोगान्ती ही गोष्ट मान्य करू लागले आहेत. ‘कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियांच्या अनुभूतीचे ‘सार’ मनामुळेच अनुभवता येते. त्याचा जर सहभाग नसेल तर ती ‘अनुभूती’ येऊ शकत नाही. यालाच स्वामी विवेकानंदांनी ‘प्रेझेन्स ऑफ माईंड इज इनेव्हिटेबल इन एनी प्रोसेस’ असे म्हटले आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन ज्यांना ‘फादर ऑफ मॉडर्न एक्पेरीमेंटल सायकॉलॉजी’ असे बहुमानाने संबोधिले जाते ते विल्हेल्म वुुंड्ट् म्हणतात- ‘आपले हे मन कसे आहे म्हणाल तर आपल्या अंतरंगातील असलेल्या अनुभूतींचे, सूक्ष्म संस्कारांचे आपल्याला दर्शन घडविणारे सूक्ष्मतम साधन आहे. (सम ऑफ अवर इनर एक्स्पीरियन्सेस) या द्वाराच आपण भावना, जिव्हाळा, विचार, इच्छा इत्यादींच्या रूपाने आंतरिक क्षेत्रात सूक्ष्मरूपाने अस्तित्वात असलेल्या संस्कारांना ‘प्रकट’ करू शकतो (आयडिएशन, फिलिंग, विलिंग कलेक्टेट टुगेदर) त्या तत्त्वालाच आपण ‘माईंड’ म्हणतो. (‘टोवर्डस् अ डेफिनेशन ऑफ माईंड’मधून) वरील व्याख्या वाचत असताना शेकडो वर्षांपूर्वी आपल्या संतांनी स्वानुभूतीचे सहजोद्गार म्हणून व्यक्त केलेले विचार आठवल्याशिवाय राहत नाहीत. विल्हेल्म् वुंड्ट् यांनी व्यक्त केलेला आशय श्रीसंत तुकारामांनी ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ या साध्या शब्दात किती चपखलपणे व्यक्त केला आहे. नाही का?
संतांच्या दृष्टीने मानवी मन !
भारतीय जीवन पद्धती ही अध्यात्मप्रधान आहे. वेद-उपनिषद काळापासून सृष्टी, मानव या महत्त्वाच्या घटकांचा मूलभूत शोध घेण्याचा अथक प्रयत्न भारतातील ऋषिमुनींनी, संतांनी, दर्शनकारांनी केला आहे. त्यासाठी अविश्रांत मेहनत म्हणजे तपश्चर्या, साधना केली आहे. त्याद्वारा भगवद्गीतेत वर्णन केल्याप्रमाणे बाह्यसृष्टीपासून तो आंतरिक आत्मसृष्टीपर्यंतचे संशोधन ते सहजपणे करू शकले. त्याचा क्रम निश्चित करू शकले. एवढेच करून ते थांबले नाहीत तर त्याबरहुकूम मानवी मनालाही वळण कसे लावावे? त्याच्यावर संस्कार कसे करावेत? त्याच्या माध्यमातून मानवी जीवनाचा परमपुरुषार्थ कसा साध्य करावा, याचेही मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या साहित्यात अनेक ठिकाणी, विविध संदर्भात करून ठेवले आहे. त्यांच्या चिंतनाचा आधार श्रुती म्हणजे वेद-उपनिषद हेच आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात पाहिलेल्या मनाच्या आधुनिक संशोधित व्याख्यांचा निष्कर्ष आपण पाहिला की, ‘कर्मेंद्रिये आणि आंतर तत्त्वे’ या दोहोंचेही लगाम ‘मनाच्या’ हातात आहेत (माईंड इज कंट्रोलिंग युनिट) त्याच्या सहभागाशिवाय कोणतीही प्रक्रिया होत नाही. हेच ‘सत्य’ हजारो वर्षांपूर्वी कठोपनिषदात स्पष्टपणे मांडले आहे. ‘रथ आणि रथी’ याचा दृष्टान्त देऊन मनाच्या सामथ्र्याचेच वर्णन उपनिषदकारांनी केले आहे.
आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु।
बुद्धी तु सारथी विद्धि मनः प्रग्रहमेव च।।३।।
म्हणजे- ‘हे नचिकेत्या! जीवात्मा म्हणजे रथात बसलेला स्वामी समज. देहाला रथ समज. या रथाला चालविणारा सारथी म्हणजे बुद्धी असून त्याच्या हाती मनरूपी लगाम आहे जो इंद्रियरूपी अवखळ अश्वांना आवरण्याचे कठीण कार्य करीत असतो.’ यात ‘आत्मेन्द्रियमनोयुक्तम् म्हणजे शरीर, इंद्रिये आणि मन याच्यासह कार्य करणारा घटक जो आहे त्याचाच निर्देश आधुनिक शास्त्रज्ञांनी ‘कलेक्टेड टु गेदर’ या शब्दांमध्ये केला आहे.
कठोपनिषद काळापासून मानवी जीवनातील केंद्रबिंदू म्हणून असलेल्या मनाचे अस्तित्व, त्याचे सामर्थ्य भारतीयांनी ओळखले आहे. संतांनी साध्या भाषेत ते लोकांपर्यंत पोहोचविले आहे. आधुनिक संशोधकांना शेकडो व्याख्यांमध्येही स्पष्ट करणे जे जमले नाही ते ज्ञानेश्वर माउलीने मोजक्या शब्दात सांगितले आहे. ते मन कसे आहे हे सांगताना म्हणतात-
(मन) जे इच्छेते वाढवी। आशेते चढवी।
जे पाठी पुरवी। भयासि गा ।।१३।११२।।
द्वैत जेथे उठी। अविद्या जेणें लाठी।
जें इंद्रियांते लोटी। विषयांमाजी।।११३।।
संकल्पे सृष्टी घडी। सवेचि विकल्पूनि मोडी।
मनोरथांच्या उतरंडी। उतरी रची।।११४।।
जे भुलीचें कुहर। वायुतत्त्वाचें अंतर।
बुद्धिचें द्वार। झांकविले जेणे।।११५।। parapsychology
म्हणजे- कोणतीही क्रिया करण्यास भाग पाडणारे, वासना बळकट करणारे, इच्छेला वाढविणारे, आशेला प्रबळ करणारे, भयाचा पाठपुरावा करणारे, द्वैत भाव प्रकट करणारे, संकल्प-विकल्प मात्रे सृष्टी रचणारे, मोडणारे मनोरथांच्या उतरंडी रचणारे असे हे ‘मन’ आहे. या मनाचा शोध, अस्तित्वाची जाण आधुनिक विज्ञानाला १८ व्या, १९ व्या शतकापासून आली. parapsychology भारतीयांनी वेद-उपनिषद काळापासून ते जाणले. नुसतेच जाणले नाही तर स्वत:चा उद्धार करण्यालाही त्याला ‘मित्र’ कसे बनवावे, याचे शास्त्रशुद्ध विवेचन करणारे शेकडो ग्रंथ लिहून ठेवले. मग- ‘‘पॅगन म्हणजे मागासलेले कोण? भारतीय? की… ‘ते’?