सांगली : राज्यात पुन्हा वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सातऱ्यात मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर आता सांगली जिल्ह्यातही मास्क आणि सोशल डिस्टन्स पाळण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. शिवाय सॅनिटायझर वापरण्यास सांगितले आहेत. तसंच शासकीय कार्यालयात मास्क अनिवार्य करण्यात आला आहे. सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनी याबाबतच्या सूचना जारी केल्या आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यामधील कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ सुरू आहे. जिल्ह्यामध्ये सध्याच्या घडीला ५० हुन अधिक रुग्ण कोरोना उपचार घेत आहेत. ही वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाकडून आता खबरदारीच्या उपायोजना घेण्यात येत आहेत. कोरोनाची व्याप्ती वाढू नये यासाठी सांगली जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सांगली जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय कार्यालये, तसंच बँका, शाळा, महाविद्यालयातील शासकीय विभागातील अधिकारी, कर्मचारी यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्कचा वापर दैनंदिन करणे अनिवार्य असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत. तसंच कोविड-19 आजाराच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्वतयारी उपाययोजना राबविण्याच्या सूचना ही करण्यात आल्या आहेत.