जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकातून चाळीसगाव बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. या प्रकरणी संबंधित महिलेच्या फिर्यादीवरून एका ३० वर्षीय महिलेसह एका अल्पवयीन मुलीवर जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, बसस्थानकात महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्याच्या घटना वाढत असून, गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील जानकीनगर येथील रहिवासी लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय ३५) या रविवारी सायंकाळी जळगाव बसस्थानकावर चाळीसगाव बसमध्ये चढत होत्या. त्यावेळी बसमध्ये प्रवाशांची नेहमीप्रमाणेच मोठी गर्दी होती. याच गर्दीचा गैरफायदा घेत ध्रुपता अक्षय भोसले (वय ३०, रा. छत्रपती संभाजीनगर) आणि तिच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलीने लक्ष्मी चौधरी यांच्या गळ्यातील सोन्याच्या मंगळसूत्राची पोत कापली. त्यातील सोन्याची वाटी आणि मणी चोरून घेऊन गर्दीतूनच पळ काढला. आपल्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेल्याचे लक्षात येताच लक्ष्मी चौधरी यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात धाव घेतली.
आठवडाभरातील तिसरी घटना
नवीन बसस्थानकात बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेऊन, महिलांच्या गळ्यातील सोनपोत लांबविल्याच्या घटना वाढत असून, गेल्या आठवडाभरातील ही तिसरी घटना आहे.
गेल्या आठवड्यात टॉवर चौकात चोपडा बसमध्ये चढताना एका महिलेच्या बॅगमधील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लांबवले होते. तर नवीन बसस्थानकात चोपडा बसमध्ये चढताना अयोध्या नगरातून हळदीचा कार्यक्रम संपवून चोपड्याला जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनपोत लांबविली होती. या घटना जळगाव शहरातील असून, जिल्हाभरात गेल्या आठवडाभरात ६ ते ७ घटना घडल्या आहेत.