Manipur Violence : शांतता करारानंतर पुन्हा उसळला हिंसाचार ; अनेक घरांना लावली आग

Manipur Violence : मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात शांतता राखण्यासाठी मेतेई आणि हमार समुदायांमध्ये एक करार झाला होता. गुरुवारी आसाममधील कछार येथील सीआरपीएफ सुविधा केंद्रात झालेल्या बैठकीत समोरासमोर बसून दोन्ही पक्षांमध्ये हा करार झाला होता. मात्र, करारानंतर 24 तासांत जिरीबाममध्ये पुन्हा हिंसाचार उसळला आहे. येथे मेईतेई कॉलनीत गोळ्या झाडण्यात आल्या असून, लालपाणी गावात एका घराला आग लावण्यात आली.

या करारानंतर 24 तासांच्या आत जिरीबामच्या लालपाणी गावात हिंसाचार झाला. शुक्रवारी रात्री सशस्त्र लोकांनी गावातील एका घराला आग लावली. गावाला लक्ष्य करत गोळ्यांच्या अनेक फैरी झाडण्यात आल्या. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा दल पाठवण्यात आले आहेत.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुरक्षेतील त्रुटींचा फायदा घेत हल्लेखोरांनी जाळपोळ केली. गेल्या वर्षी मे पासून, मेईतेई आणि इम्फाळ खोऱ्याच्या आसपासच्या डोंगराळ भागात असलेल्या कुकी-जो गटांमधील जातीय हिंसाचारात 200 हून अधिक लोक मारले गेले आणि हजारो बेघर झाले आहेत.

वांशिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण जिरीबाममध्ये वांशिक हिंसाचाराचा मोठा फटका बसला नाही. मात्र, यावर्षी जूनमध्ये शेतात एका शेतकऱ्याचा विकृत मृतदेह आढळल्यानंतर येथेही हिंसाचार सुरू झाला.

दोन्ही बाजूंनी झालेल्या जाळपोळीच्या घटनांमुळे हजारो लोकांना आपली घरे सोडून मदत छावण्यांमध्ये जावे लागले. येथे जुलैच्या मध्यात दहशतवाद्यांनी गस्तीदरम्यान सुरक्षा दलांवर हल्ला केला होता. यावेळी एका सीआरपीएफ जवानाला प्राण गमवावे लागले होते.