नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना दिल्ली उच्च न्यायालयाकडून जोरदार झटका बसला आहे. दिल्लीतील मद्य घोटाळ्याप्रकरणी मनिष सिसोदियाच मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका ठेवत विशेष न्या. एम. के. नागपाल यांनी मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. १७ एप्रिलपर्यंत मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढण्यात आली आहे.
दिल्लीतील मद्य घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार मनिष सिसोदिया असून, त्यांना सुमारे ९० ते १०० कोटी रुपये लाच म्हणून देण्यात येणार होते, असा दावा सीबीआयने केला होता. तसेच या मद्य घोटळ्यात मनिष सिसोदिया यांचा सक्रीय सहभाग होता, असे निरीक्षण न्यायालायाने नोंदवले आहे. विशेष न्या. एम. के. नागपाल यांनी मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला.
विशेष न्या. एम.के.नागपाल यांनी म्हटले आहे की, मनिष सिसोदिया यांनी काही मोजक्या ब्रॅण्ड्सना फायदा करून देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सिसोदिया यांनी सर्व नियम डावलले. दक्षिणेतील लॉबीशी असलेला संबंध हा या प्रकरणाचा सर्वात महत्त्वाचा पैलू आहे. या मद्य घोटाळ्याची व्याप्ती खूप मोठी आहे. याचा प्रभाव अनेकांवर पडणार आहे. याचा विचार सिसोदिया यांनी केला नाही. तसेच यामुळे सामान्य माणसांवर मोठा परिणाम होऊ शकतो, ही बाबही विचारात घेतली नाही, असे न्यायालायने म्हटल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, मनिष सिसोदिया यांचा जामीन अर्ज मंजूर करता येणार नाही. सिसोदिया यांना जामीन मंजूर केल्यास बाहेर पडल्यावर या प्रकरणाशी संबंधित गोष्टींमध्ये ते छेडछाड करण्याचा प्रयत्न करू शकतात. महत्त्वाच्या बाबींवर प्रभाव पाडू शकतात. अद्यापही मद्य घोटाळ्याचा तपास पूर्ण झालेला नाही. अशा परिस्थितीत सिसोदिया यांना सोडणे योग्य होणार नाही, असे न्यायालयाने म्हटल्याचे सांगितले जात आहे.