Manoj Jarange Patil : मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आता थेट मुंबई गाठणार आहेत. मुंबईतील आझाद मैदानात मनोज जरांगे उपोषण करणार आहेत. मात्र त्याआधी ते लाखो मराठा बांधवांसह अंतरवाली सराटी येथून पायी मुंबईच्या दिशेने येणार आहे. मुंबईला येण्याच्या त्यांचा मार्ग कसा असेल, आंदोलनाची रुपरेषा कशी असेल याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी आज सविस्तर माहिती दिली आहे.
मनोज जरांगे लाखो मराठा बांधवांसोबत २० जानेवारीला सकाळी ९ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. जालना-बीड-अहमदनगर मार्गे पायी दिंडी मुंबईत दाखल होणार आहे.
मोर्चाचा मार्ग कसा असेल?
जालन्यातून निघालेला मोर्चा बीडमध्ये प्रवेश केल्यानंतर गेवराई-पडळ शिंगीमार्गे अहमदनगरमध्ये पोहोचणार आहे. अहमदनगरमधून शिरुर, शिक्रापूर, रांजणगावमार्गे मुंबई-पुणे महामार्गावर दिंडी पोहोचणार आहे. त्यानंतर लोणावळा-पनवेल-वाशी-पनवेलमार्गे मोर्चा आझाद मैदानात दाखल होणार आहे.
एक टीम मुंबईत जाऊन जागेची पाहणी करणार आहे. आझाद मैदानाची पाहणी करणार आहे. मोर्चा शांततेत काढा. अंतरवाली ते मुंबई दरम्यान अडीच लाख स्वयंसेवक हे पायी दिंडीमध्ये असणार आहे.
मुंबईच्या दिशेने निघालेल्या मराठा बांधवांनी आपल्या वाहनांमध्येच जेवणाची व्यवस्था करावी. मोठ्या प्रमाणात पाण्याचे टँकर आणि रुग्णवाहिका सुद्धा पायी दिंडीत सहभागी असणार आहेत. शिवाय किर्तन, भारूड ,लेझीम, यासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन पायी दिंडीत केलं जाईल, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.