जालना : मराठा आरक्षण मिळावं यासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे जालन्यातील अंतरवाली सरोटी गावात उपोषणाला बसले आहेत. मागील अकरा दिवसांपासून त्यांनी अन्नाचा कणही खाल्ला नसल्याने त्यांची प्रकृती खालावत आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे महाराष्ट्रातलं राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान,जर सरकारने पुढे काही केले नाही तर पाणी त्याग आणि उपचार बंद होतील असा इशारा मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, सरकारकडून अद्याप कुठलाही निरोप आला नाही. आमची लढाई सुरू आहे. आम्ही आमच्या शब्दावर ठाम आहे. शांततेत लढाईचे व्यापक स्वरुप होईल. आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत. मंत्रालयात जाण्यासाठी पिशव्या भरून ठेवल्यात. परंतु निरोप अजून येत नाही. आम्ही २ पाऊले मागे येतोय. माझ्या शब्दावर मी ठाम आहे.
मराठा आरक्षणाला यश येण्याची शक्यता अधिक आहे. मराठा समाजाने आंदोलन करावे, पाठिंबा वाढवावा परंतु कुठेही आंदोलनाला गालबोट लागणार नाही ही काळजी घ्यावी. मराठा समाजातील तरुणांनी कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये. आत्महत्येसारखा प्रकार करू नये. माझ्यावर विश्वास ठेवा, उग्र आंदोलन करू नये. आत्महत्या करू नये. कुणावरही गुन्हे दाखल होऊ नये. शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करावे ही माझी सर्वांना विनंती आहे. तरीही कुणी तोडफोड करत असेल तर ते आमचे कार्यकर्ते नाहीत, मराठा समाजाचे नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.
वकिलाचा आत्महत्येचा प्रयत्न
मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य कराव्या, यासाठी जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका वकिलाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. मारुती भाऊसाहेब वाडेकर असं आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या मागण्या मंजूर कराव्या, या मागणीसाठी त्यांनी आज जालन्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.