शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार! महाराष्ट्रात 48 तासांत दाखल होणार मान्सून

पुणे । यंदा एका आठवड्याच्या प्रतीक्षेनंतर मान्सून केरळात दाखल झाला असून त्याचा पुढील प्रवास सुरु आहे. दरम्यान, महाराष्ट्र्रात मान्सून कधी दाखल होईल याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. तर दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळच संकट १४ जूनपर्यंत हे वादळ कायम राहणार असल्यामुळे राज्यात मान्सून पुन्हा लांबणार का असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.

भारतीय हवामान विभागाने मान्सूनची प्रगती पाहून राज्यात कधी येणार? याचे उत्तर दिले आहे. पुढील दोन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. 48 तासांत गोव्यासह महाराष्ट्राच्या काही भागात मान्सून दाखल होणार आहे. दरम्यान पेरणीसाठी आवश्यक पावसासाठी आणखीन 10 दिवसांची प्रतीक्षा असणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सध्या पेरणीची घाई करु नये, असा सल्ला पुणे वेधशाळेने दिला आहे.

शनिवारी (१० जून) मान्सूनने पश्चिम किनारपट्टीवरून पुढे चाल करत मध्य अरबी समुद्र, केरळचा उर्वरित भाग, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टीचा भाग, बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांसह पूर्वोत्तर राज्यांच्या बहुतांशी भागात धडक दिली.

सध्या मान्सूनच्या वाटचालीची सीमा कारवार, मेरकरा, कोडाईकनाल, आदिरामपट्टीनमपर्यंत असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. कर्नाटकमध्ये आलेला मान्सून पुढील दोन दिवसात महाराष्ट्रात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.