पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. तिने यासह भारताचं पदकांचा खातंही उघडलं आहे.
२२ वर्षीय मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तिने शनिवारी पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. आता अंतिम फेरीत तिने २२१.७ गुण मिळवत पदकावर हक्क सांगितला.
मनू भाकर नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज, तर पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारताकडून नेमबाजीत राज्यवर्धन सिंग राठोड (२००४), अभिनव बिंद्रा (२००८), विजय कुमार (२०१२) आणि गगन नारंग (२०१२) यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे.
हरियाणामधी झज्जर येथे मनू भाकर हिचा जन्म झालाय. शाळेत असल्यापासूनच तिला खेळाची आवड होती. शाळेमध्ये मनू टेनिस, स्केटिंग आणि बॉक्सिंगसारख्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची. यामध्ये तिने ‘थान टा’ नावाच्या मार्शल आर्टमध्ये राष्ट्रीय स्तरावर पदके जिंकली होतीत. मात्र बॉक्सिंगमध्ये तिच्या डोळ्याला दुखापत झाली आणि तिचा बॉक्सिंगमधील प्रवास संपला होता. पण खेळापासून ती स्वत:ला जास्त दूर ठेवू शकत नव्हती. वयाच्या 14 व्या वर्षी मनू हिन नेमबाजीमध्ये आपले करियर करण्याचा निर्णय घेतला. वडिलांना पिस्तुल खरेदी करण्यास सांगितले. त्यानंतर मुलीच्य स्वप्नांना पाठिंबा देणाऱ्या तिच्या वडिलांनी पिस्तुल विकत घेऊन दिली होती, आज त्याच मनू भाकरने भारतासाठी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पदकांचं खातं उघडलं आहे.
गोल्ड कोस्ट 2018 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत मनु भाकर कॉमनवेल्थ गेम्स चॅम्पियन आहे. ब्युनोस आयर्स 2018 मधील युवा ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारी देशातील पहिली महिला खेळाडू आहे. गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर सांघिक पिस्तूलचे विजेतेपद पटकावले होते. ISSF वर्ल्ड कप स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी मनु भाकर सर्वात तरूण भारतीय खेळाडू आहे. 2023 च्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात मनु पाचव्या स्थानावर होती. त्यामुळे भारतासाठी पॅरिस 2024 ऑलिम्पिकमध्ये कोठा मिळवला होता.