मुंबई । नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या काही आमदारांनी पक्षादेश डावलून मतदान केल्याचा फायदा महायुतीला झाला असून फुटीरांच्या विरोधात कारवाई केली जाईल, असे राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे. फुटीर आमदार कोण हे समजल्याचा दावाही नाना पटोले यांनी केला आहे. यानंतर आता काँग्रेसमध्ये प्रचंड असंतोष असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात सध्या अनेक आमदारांमध्ये खदखद असल्याचे बोलल जात आहे. काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी नाना पटोलेंवर थेट आरोप केले आहेत. “नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून अनेक आमदार नाराज आहेत. शपथ घेऊनही त्यांनी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यावर आरोप केले. तसेच नाना पटोले यांनी मतदारसंघात काय चाललंय, याबद्दल कधीच विचारलं नाही”, असा आरोप हिरामण खोसकर यांनी केला आहे.
“तिकीट द्यायचं नसेल तर देऊ नका. पण बदनाम करु नका. मी याबद्दल कार्यकर्त्यांशी बोलून पुढील भूमिका ठरवणार आहे. तसेच पक्ष श्रेष्ठी हे माझी बदनामी करत आहेत. काँग्रेसचे अनेक आमदार अध्यक्षांवर नाराज असून त्यांनी वरिष्ठांना तक्रार केली आहे”, असेही हिरामण खोसकर यांनी म्हटले.
“विधान परिषद निवडणुकीत मी महाविकासआघाडीच्या उमेदवाराला मतदान केलं. याबद्दल मी शपथ घेऊन सांगितलं, तरी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली. ज्यांचे मत फुटले, त्या 6 जणांवर कारवाई नाही आणि शपथ घेऊन सुद्धा माझ्यावर मात्र आरोप करण्यात आला. मला उमेदवारी द्यायची नसेल तर नका देऊ, पण बदनाम करू नका. पक्षश्रेष्ठींकडून माझी बदनामी होत आहे आणि हे चांगलं नाही”, असेही हिरामण खोसकर म्हणाले.
दरम्यान येत्या शुक्रवारी, 19 जुलै रोजी टिळक भवनमध्ये काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ही बैठक आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारसंघ निश्चितीवर चर्चा करण्यासंदर्भात होत आहे. मात्र याच बैठकीत फुटीर आमदारांसंदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान काही आमदार काँग्रेसच्या रडारवर असल्याचं सांगितलं जात आहे.