उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले, त्यावेळेस गप्प का बसला? भाजपाचा जरांगेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. त्यानंतर भाजपाने मनोज जरांगे यांनी केलेल्या आरोपांवर पलटवार करताना प्रतिप्रश्न केला आहे. जरांगे पाटील जे बोलतात त्या मागे स्क्रिप्ट कोणाची आहे? मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, ही भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात आरक्षण गेले त्यावेळी तुम्ही गप्प का बसता? शरद पवार इतकी वर्षे आरक्षण देऊ शकले नाही त्यावेळी गप्प का बसला? अशी विचारणा भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर निघालेले मनोज जरांगे यांनी संचारबंदी लागू केल्यावर भांबेरी गावातून अंतरवाली सराटीत परत फिरले. तर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत इंटरनेट बंदी लागू करण्यात आली आहे. बससेवाही बंद ठेवण्यात आली आहे. यानंतर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीका केली आहे. आमच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी सोडावे. सगेसोयरे याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. देवेंद्र फडणवीसांना आता हरवायचे आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही. राज्यासह देशात त्यांना अडचणीत आणू. जनतेचा अंत पाहू नये. चारबंदी लावून सरकार चालवण्यात कसली मर्दानगी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यात दम नाही, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार टीका केली.

त्यानंतर जरांगे पाटलांवर आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. ते बालबुद्धी आहेत. आपण गेले पाच सहा महिने त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सांगत होतो. आता तर त्यांचा मास्टरमाईंड संपूर्ण राज्याला कळला आहे. ते राजकीय व्यक्ती आहेत. त्यांनी अनेक पदे भूषविली आहेत. आता निवडणूक जवळ आल्याने त्यांच्यातील राजकीय महत्वाकांक्षा जागृत झाली आहे. महाराष्ट्राचे जनता बालबुद्धी, अपरिपक्व आणि घिसाडघाई करणारे नेतृत्व कदापि स्विकारणार नाही. त्यांचा एकदिवस गुजरातच्या हार्दिक पटेल होईल अशी टीका आशीष देशमुख यांनी केली आहे. महाराष्ट्र प्रगत आणि सुसंस्कृत राज्य आहे. फडणवीस यांच्या सारख्या नेत्यावर अशी हीन टीका मराठा समाज, महाराष्ट्राची जनता सहन करणार नाही असेही देशमुख यांनी म्हटले आहे.