नांदेड : मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी सध्या राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाची धग नांदेड जिल्ह्यात कायम आहे. आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. त्यातच नांदेड जिल्ह्यात एक बस जाळण्याचा प्रकार घडला आहे. वसमत रोडवर २० ते २५ अज्ञात तरुणांनी बसवर दडगफेक केली आणि त्यानंतर बस पेटवून दिल्याची माहिती आहे. या धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
३० ते ४० प्रवासी या बसनं प्रवास करत होते. हा प्रकार नांदेड ते मालेगाव रोडवर कासारखेडा ते डौर दरम्यान मंगळवारी रात्री घडला. वसमतहून नांदेडकडं जाणारी एसटी क्रमांक (एम. एच. २० बी. एल. ११४६ ) बस नेहमीप्रमाणं रात्री आठ वाजताच्या सुमारास मालेगाव मार्गे जात होती. आंदोलकांनी प्रवाशांना खाली उतरुन बस पेटवून दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. यावेळी त्यांनी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत घटनास्थळाहून पळ काढला.
आधी दगडफेक करून ही बस थांबवली. त्यानंतर बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि मग पेट्रोल टाकूनही बस पेटून देण्यात आली. बस पेटवल्यानंतर हल्लेखोर पळून गेले. या हल्ल्यामुळे प्रवाशीही घाबरले. बस थांबताच सर्व प्रवासी जीव वाचवत बसच्या बाहेर पडले. त्यानंतर या अज्ञात तरुणांनी बसवर पेट्रोल टाकून बस पेटवून दिली. यावेळी त्यांनी एक मराठा, लाख मराठाच्या घोषणा देत घटनास्थळाहून पळ काढला. त्यामुळे हे मराठा आंदोलक होते की अन्य कोणी लोक होते याबाबतचा तपास सुरू आहे.
दरम्यान, मराठा आंदोलक चांगलेच आक्रकम झाले आहेत. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील मेंढला आणि उमरी या दोन गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तशा आशयचे फलक या दोन्ही गावात लावण्यात आले आहेत. चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष.. मराठा आरक्षण मिळेपर्यंत सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांना गावात प्रवेश नाही, असा मजकूर या फलकावर आहे.
मेंढला येथील गावकऱ्यांनी नेत्याच्या गावबंदीसह मतदानावर बहिष्कार घातल्याना देखील निर्णय घेतला आहे. उमरी गावात देखील असे फलक लावण्यात आले आहेत. दोन्ही गावातील काही तरुण जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला देखील बसले आहेत. एकूणच नांदेडमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा तापत चालल्याचे चित्र आहे.