मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी १३ जुलैपर्यंतची राज्य सरकारला मुदत दिली आहे. दरम्यान, आज विधिमंडळात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पहायला मिळाली. विधिमंडळात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपा आमदार अमित साटम यांनी विरोधी पक्षातील आमदारांवर टीका केली. यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी प्रत्युत्तर देत महायुतीवर गंभीर आरोपही केले.
“काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्रात जातीच्या नावावर तेढ निर्माण होत आहेत, काही गावात मराठ्यांच्या लग्नाला ओबीसी जात नाहीत, ओबीसींच्या लग्नाला मराठे जात नसल्याचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे या विषयावर तोडगा काढण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं होतं. पण विरोधी पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातला. विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचं आहे, असा आरोपही आमदार अमित साटम यांनी केली. “मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोधी पक्षाचा पाठिंबा आहे की नाही हे जाहीर करावं, अशी मागणीही अमित साटम यांनी केली.
आरक्षण प्रश्न सोडविता येत नसेल तर सरकारमधून बाहेर पडा
पत्रकारांशी बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, मराठा आणि ओबीसी समाजात महायुतीने तेढ निर्माण केले आहे. आरक्षणाचा प्रश्न या सरकारला सोडवायचा नाही. हे आता स्पष्ट झाले आहे. सरकारने सभागृहात भूमिका स्पष्ट करणे अपेक्षित आहे. त्यामुळे जनतेला आरक्षणाबाबतची माहिती मिळू शकते. परंतु सरकारला जनतेला अंधारात ठेवायचे आहे. म्हणून आरक्षण प्रश्नावर सरकार सभागृहात बोलत नाही. खरे तर आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याची या सरकारची इच्छाशक्ती नाही. त्यामुळे महायुतीने सत्तेतून बाहेर पडावे, अशा शब्दांत विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला.
मुंबई जाम करण्याचा इशारा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलन करणारे लक्ष्मण हाके यांनी आक्रमक होत मुंबई जाम करण्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांनी उपस्थित राहणे आवश्यक होते. ओबीसींसंदर्भातील ठाम भूमिका मांडायला हवी होती. दहा दिवस उपोषण केल्यानंतर शासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिले आहे. पक्षांचे नेते ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार असल्याचे सांगत आहे. परंतु, शासनाने सगेसोयरेंचा अध्यादेश आणण्याची तयारी सुरू केल्याची माहिती आम्हाला मिळत आहे. हा अध्यादेश आला, तर आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. मुंबईत जाम करू. आम्ही शासन काय करते, याची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले.