मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेलं आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. मराठ्यांना १० टक्के स्वतंत्र आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने मंजूर केला. मात्र, ओबीसींमधूनच आरक्षण घेण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम असून त्यासाठी त्यांनी आंदोलन चालूच ठेवलं आहे.
यासंदर्भात आता मनोज जरांगे पाटील यांनी थेट देवेंद्र फडणवीसांवर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे. या सगळ्याच्या पाठिशी देवेंद्र फडणवीसच असल्याचा खळबळजनक आरोप जरांगे पाटील यांनी आंतरवलीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केल्यानंतर राज्य सरकारने रोखठोख भूमिका घेतली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे ?
प्रत्येकाने मर्यादेत राहिलं पाहिजे. जरांगे यांचे आरोप खालच्या पातळीवरचे आहे. गृह विभाग या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. कोणी जर परिस्थिती बिघडवली तर कुणालाही माफ करणार नाही, असा इशारा शिंदेंनी दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कायदा सुव्यस्था राखण्याचा जबाबादारी आमची आहे. सरकारने केलेल्या कामाची जाणीव आंदोलनकर्त्यांनी ठेवली पाहीजे. कोर्टानं दाखवलेल्या त्रुटी आम्ही दूर केल्या. आरक्षण कोर्टात टिकेल ही जबाबदारी आमची आहे. सगेसोयऱ्यांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. जो शब्द आम्ही दिला तो पाळला आहे.
मनोज जरांगे यांच्या मागण्या सतत बदलत गेल्या. मनोज जरांगे पाटील मराठा समाजासाठी प्रमाणिक भावना मनामध्ये ठेऊन लढ्यामध्ये उतरले, अशी भावना आमची होती. त्यामुळे जस्टीस शिंदे कमिटी केली. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हत, ते दिलं. त्यानंतर मागणी आली सरसकट द्या, त्यांनतर राज्यात व्याप्ती वाढवा म्हणाले ते आम्ही केलं. आता सगेसोयऱ्यांची मागणी आली. त्यावर नोटीफिकेशन काढलं, त्यावर हरकती आल्या आहेत. त्यांनी ओबीसीमधून आरक्षण द्या म्हणाले. वेळोवेळी मागण्या बदलत गेल्या.
मनोज जरांगे यांना भेटायला मी जालन्यात गेलो. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ५६ मोर्चे झाले. ते शांततेत झालं. पण यावेळेस कुठं आग लावली, कुठं दगडफेक झाली हे सर्व कोणी केलं?. पण मराठा समाज सयंमी पण जे आंदोलनाला गालबोट लावत आहेत, त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहावं. मी मुख्यमंत्री असताना अंहकार ठेवला नाही. पण मनोज जरांगेंची भाषा आता राजकीय वाटत आहे. त्यामागे कोणीतीरी बोलत आहे. सरकारने घेतलेल्या निर्णय विचार करुन घेतला आहे, असे शिंदे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत जे बोलले ती आपली संस्कृती नाही आहे. खालच्या भाषेत टीका करण्यात आली. जरांगे यांनी कुणीतरी शब्द लिहून दिले, हे महाराष्ट्र सहन करत नाही, असे शिंदे म्हणाले.