मराठा आरक्षण : 85 बसेसची तोडफोड ; 4 कोटींचे नुकसान

त्रपती संभाजी नगर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाल आहे. आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आमरण उपोषणावर ठाम असून शांततेत विषय हाताळण्याचे आवाहन करत आहेत. तर दुसरीकडे संतप्त आंदोलकांनी आपला राग लालपरीवर काढला आहे. आक्रमक जमावाने गेल्या 4 दिवसात 85 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड केली तर 4 एसटी बसेस ची जाळपोळ केली आहे. यामुळे गेल्या 4 दिवसात एसटी महामंडळाचे 4 कोटींचे नुकसान झाले आहे.

गेल्या 3 ते 4 दिवसापासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद आहे. तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे. या जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पुर्णतः बंद असल्याची माहिती देण्यात आली आहे.

आक्रमक जमावाने गेल्या 4 दिवसात 85 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड केली तर 4 एसटी बसेस ची जाळपोळ केली आहे. यात बीड जिल्ह्यात यापैकी ७० बसेसची मोडतोड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे 4 कोटी रुपयांचे नुकसान झाले असून दररोज एसटीचा 2 ते 2.5 कोटी रुपयांचा महसूल बुडत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करु नका, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. गावागावात आमरण उपोषण करा, साखळी उपोषण करा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले. तसेच नेत्यांना गावात बंदी घाला. तुम्हीही त्यांच्या दारात जाऊ नका, असेही ते म्हणाले. आंदोलकांच्या मागणीनंतर मी घोटभर पाणी प्यायलो आहे. त्यामुळे आंदोलकांनी तोडफोड करु नये. कायदा हातात घेऊ नये, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.