मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. तेव्हापासून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून लातूर जिल्हयातील अनेक गावांत पुढाऱ्यांना गाव बंदी केली आहे तसेच पुढाऱ्यांना अडवून जाब विचारला जात आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये अंबादास दानवे, प्रताप पाटील चिखलीकर, रोहित पवार, हसन मुश्रीफ, अजित पवार या नेत्यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा फटका बसला. त्यानंतर शनिवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर व मंत्री शंभुराज देसाई यांना सकल मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले.
सकल मराठा समाजाने रविकांत तुपकर यांची लातूरच्या औसा रस्त्यावर असणाऱ्या विश्रामगृहातील बैठक उधळून लावली. त्यांना मराठा आरक्षणाच काय झालं म्हणून जाब विचारला. राजकीय पुढाऱ्यांना बंदी केली असताना तुम्ही लातूरमध्ये आलाच कसे, आंदोलकांनी तुपकर यांना विचारले. यावेळी रविकांत तुपकर विश्रामगृहातील एका सोफ्यावर बसले होते. मराठा आंदोलकांनी त्यांना घेरत जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
‘रविकांत तुपकर चले जाव’, ‘रविकांत तुपकर परत जा, परत जा’ अशा घोषणा आंदोलक देत होते. रविकांत तुपकर यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणीही त्यांचे ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. आंदोलक तुपकर यांच्यासमोर जोरजोरात घोषणा देत राहिले. अखेर रविकांत तुपकर यांनी सोफ्यावरुन उठत बैठक रद्द केली आणि ते माघारी फिरले.
मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा बनलेला असताना पालकमंत्री शंभूराज देसाई यांना शनिवारी साताऱ्यात मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. प्रश्नांची सरबत्ती करत मराठा आंदोलकांनी शंभूराज देसाईंना घेराव घातला. आजपर्यंत सरकारने फक्त आश्वासनांचा पाऊस पडला पण काम एक रुपयाचं केलेलं नाही, आरक्षण कधी देणार? एवढंच सांगा, असा सवाल करत मराठा आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली.
बारामतीत अजित पवारांनाही मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. माळेगाव साखर कारखानाच्या गळीप हंगामाची सुरूवात आजपासून होतेय. याठिकाणी मोळीपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात येणार होते. परंतु मोळीपूजनाला अजित पवारांनी येऊ नये असा पवित्रा मराठा आंदोलकांनी घेतला. अखेर अजित पवारांनी या कार्यक्रमाला जाणेच टाळले.