Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आरक्षणाचा कायदा करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष अधिवेशन बोलवण्यात येणार आहे. येत्या २६ फेब्रुवारीपासून मुंबईत या अधिवेशनाला सुरुवात होईल, अशी माहिती साम टीव्हीला सूत्रांनी दिली आहे. मंगळवारी (१९ डिसेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची घोषणा केली होती
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारी २०२४ मध्ये राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, असं एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हिवाळी अधिवेशनात सांगितलं होतं.
मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही, याची खात्री देतो, अशी ग्वाही त्यांनी विधानसभेत दिली होती. मराठा आरक्षणाचा वाद सध्या सुप्रीम कोर्टात सुरू असून तिथे अपयश आल्यास आरक्षणासाठी पुन्हा एकदा कायदा केला जाईल, असंही शिंदे म्हणाले होते.
ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास टिकणारे आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध आहे, असा पुनरुच्चार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सविस्तर भूमिका मांडली.
यावेळी त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. सरकारला मराठा आरक्षणासाठी २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. त्यांनी दिलेला शब्द पाळून आरक्षण द्यावं, अन्यथा आम्ही आंदोलन पुकारु, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.