मुंबई : मराठा आरक्षणाचे आंदोलनाची धग राज्यभरात वाढली आहे. आता मराठा समाज प्रचंड आक्रमक झाल्याने राजकारण्यांनी देखील त्यांची धास्ती घेतली आहे. यामुळे लोकप्रतिनिधींनी देखील राजीनामास्त्र बाहेर काढले आहे. त्यातच कालपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाचे आमदार, ठाकरे गटाचे आमदार विधानसभेच्या आवारात आंदोलनाला बसले होते. आज त्यांनी मंत्रालयाला टाळे ठोकले आहे.
मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवावे, अशी मागणी या आमदारांनी केली आहे. यामध्ये राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे यांचा समावेश आहे.
राज्यभरात मराठा आरक्षण मिळण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा वणवा भडकलेलाच असून, बीड, धाराशिवमध्ये संचारबंदी तर जालन्यामध्ये इंटरनेटबंदी लागू करण्यात आली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको, आमरण उपोषण करण्यात आले. मराठा आंदोलनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढत असून, आरक्षणप्रश्नी तोडगा काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली आहे.
शासनाने घेतलेला एकही निर्णय आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे. शासनाने काय करायचे ते करावे. बुधवारी रात्रीपर्यंत मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आज रात्रीपासून पाणी पिणे बंद करणार असून, होणाऱ्या परिणामांना शासन जबाबदार असेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.