राज्यात मराठा आरक्षण आंदोलन पेटले, मराठा समाज संतप्त

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी तीव्र स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आंदोलनकर्त्यांकडून काही ठिकाणी हिंसक प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काही ठिकाणी बसवर दगडफेकही झाली आहे. बसवरील सरकारी जाहिरातींना काळे फासणे, नेत्यांना गावबंदी करणे, जाळपोळीच्या काही घटनाही समोर आल्या आहेत.

जालना तालुक्यातील रामनगर येथे तहसीलदारांनी आंदोलनस्थळी भेट न दिल्याने समाजबांधवांनी त्यांच्या वाहनाच्या काचा फोडल्या. एक ते दोन बसवरही दगडफेक केली. धाराशिव शहराजवळील सूतमिल व ढोकी येथे दोन बसवर दगडफेक झाली. चऱ्हाटा (ता. बीड) परिसरात कल्याण-बीड बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्यानंतर पुन्हा बससेवा बंद करण्यात आली. धुळे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

हिंगोली व लातूर येथे बसेसवरील सरकारी जाहिरातींमधील नेत्यांच्या फोटोवर काळे फासले. परभणी जिल्ह्यात नेत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले, झरी गावात बसेसवरील  सरकारी जाहिरातींना काळे फासले. नांदेड जिल्ह्यात शेकडो गावांमध्ये नेत्यांना गावबंदी, आमदार, खासदारांची नावे पुसण्याचा उपक्रम सुरू आहे.

आत्महत्यांचे सत्र सुरू

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्यांचे सत्र सुरू असून मराठवाड्यात चार जणांनी आत्महत्या केल्या आहेत.  कुक्कडगाव (ता. अंबड, जि. जालना) येथे शनिवारी रात्री २७ वर्षीय तरुणाने गळफास घेतला. अजय रमेश गायकवाड असे मयताचे नाव आहे. तो आत्महत्येपूर्वी अंतरवाली सराटी येथील उपोषणस्थळी गेला होता. गोंद्री (ता. औसा, जि. लातूर) येथील शरद वसंत भोसले (वय ३२) या तरुणाने रविवारी गळफास घेतला. तिसरी आत्महत्या बीड जिल्ह्यातील आहे.

परळी तालुक्यातील गोवर्धन (हि.) येथील गंगाभीषण रामराव मोरे (३३) या तरुणाने रविवारी घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. याशिवाय परभणी जिल्ह्यातील बोर्डी (ता. जिंतूर) येथे एका ३९ वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.  बापूराव उत्तमराव मुळे (३९) असे मयताचे नाव आहे. त्यांनी अंतरवाली सराटी येथील सभेलाही उपस्थिती लावली होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये. या घटनांमुळे मी व्यथित झालो आहे. आत्महत्यांचा आकडा वाढत आहे. याबाबत माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी चिंता व्यक्त केली.