Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे. त्या अगोदर आज बीडमध्ये जरांगे पाटील यांची जाहीर निर्णायक इशारा सभा होणार आहे. त्यामुळे या सभेत जरांगे आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मराठा बांधवांनी या सभेसाठी जंगी तयारी केली आहे
बीडच्या सभेकडे लक्ष
सभेपूर्वी बीडमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भव्य अशी रॅली निघणार आहे. ही रॅली सुभाष रोड मार्गे अण्णाभाऊ साठे चौक याठिकाणी येईल, तिथं अण्णाभाऊ साठे यांना पुष्पहार अर्पण करून रॅली जालना रोड मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौकात येणार आहे.
याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर हे रॅली बार्शी रोड मार्गे सभास्थळाकडे जाणार आहे. आणि त्या ठिकाणी जरांगे पाटील हे आलेल्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत. 30 ऑक्टोबर रोजी बीडमध्ये (Beed News) दगडफेक आणि जाळपोळीची घटना घडली होती.
यामध्ये राष्ट्रवादीचे आमदार प्रशांत क्षीरसागर यांच्या घरावर अज्ञातांनी दगडफेक करत केली होती. याशिवाय शहरात मोठ्या जाळपोळीच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यानंतर पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली गेली. आतापर्यंत अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
दरम्यान, ही दगडफेक मराठा बांधवांनी (Maratha Reservation) केली असा, आरोप काहींनी केला होता. मात्र, ही दगडफेक आणि जाळपोळ मराठा आंदोलकांनी केलीच नाही. त्यामुळे अटक करण्यात आलेल्या मराठा बांधवांना सोडा, गुन्हे मागे घ्या. अशी मागणी जरांगे पाटील करत आहेत.
दुसरीकडे आम्ही कोणत्याही निष्पाप लोकांना अटक केली नाही. ज्यांनी गुन्हे केले त्यांनाच अटक केली आहे, अशी भूमिका पोलीस प्रशासन आणि गृहमंत्र्यांनी घेतली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी सरकारला २४ डिसेंबरचा अल्टिमेटम दिला होता. उद्या हा अल्टिमेटम संपत असून जरांगे आज काय भूमिका घेणार, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.