तरुण भारत लाईव्ह ।२४ मे २०२३। उन्हाच्या चटक्यांमुळे दुपारी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे तर दुसरीकडे काही भागात पाऊस होत आहे. मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असून परभणी, जालना, तर परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे.
परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथे दुपारी 4 वाजेच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे येथील आठवडे बाजारात ग्राहक आणि व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे आठवडे बाजारातील वडाच्या झाडाच्या फांद्या तुटून पडल्या, तसेच त्याच्याच बाजूला असलेले लिंबाच्या झाडाची फांदी तुटल्याने विजेच्या तारा तुटल्या. भाजीपाला विक्रेत्यांची पालं उडून गेली. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गावातील अनेक घरांवरचे पत्रे उडून गेली. जिंतूर, सेलू तालुक्यातही पाऊस पडताना पाहायला मिळाला.
परभणी प्रमाणे जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरासह फत्तेपूर, विरेगाव, मासनपूर आदी भागात दुपारी विजांच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह अर्धा तास जोरदार पाऊस झाला. पावसाने सखल भागात पाणी साचले होते.
परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एका शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. जिंतूर तालुक्यातील काही भागांत मंगळवारी दुपारी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. द्र्म्यना निवळी-खुर्द येथे वीज पडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण साहेबराव ठोंबरे (वय 55 वर्षे) असे मृताचे नाव आहे. शेतातील झाडाला बांधलेले दोन बैल सोडण्यासाठी ठोंबरे गेले होते. त्यावेळी ही दुर्घटना घडली. या घटनेत एक बैल दगावला. बाजूलाच असलेले मुंजाभाऊ अंभोरे हे किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.